Home राजकीय १ नोव्हेंबरच्या मोर्चात डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार…

१ नोव्हेंबरच्या मोर्चात डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार…

0
115

 

 

मुंबई :

सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या प्रमुख मागणीसाठी येत्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयावर महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीचे घटक असलेल्या डाव्या पक्षांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय एकमताने घेतला असून, या संदर्भात राज्यभर प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.

शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या फोर्ट येथील कार्यालयात झालेल्या डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, चुकीचे व अपूर्ण पत्ते, वय आणि लिंगातील तफावत, फोटो नसलेले मतदार तसेच नव्याने पात्र झालेल्या तरुणांना मताधिकारापासून वंचित ठेवणे अशा गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

या सदोष मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीची घोर थट्टा असून, संविधानाने दिलेल्या मताधिकारावर उघडपणे दरोडा घालण्यासारखे असल्याची टीका बैठकीत करण्यात आली. राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुका एकतर्फी करण्याचा कट रचल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर मतदार याद्या दुरुस्त न झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यव्यापी प्रचार मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीस भाई जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे (शेतकरी कामगार पक्ष), कॉ. शैलेंद्र कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कॉ. किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), कॉ. श्याम गोहिल, कॉ. दत्तू अत्याळकर (CPI-ML लिबरेशन), आणि कॉ. किशोर कर्डक (फॉरवर्ड ब्लॉक) हे उपस्थित होते.

तसेच कॉ. डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल) आणि अन्य डावे तसेच पुरोगामी संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here