– दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना, जिल्हा गडचिरोली व डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांची मागणी….
दिनांक : 25 सप्टेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच 1 ते 5 क्रमांकाच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. या पाचही कामांसाठी मोठी स्पर्धा झाली असून प्रत्येक निविदेत 9 ते 10 कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. नियमानुसार कंत्राटदारांकडून निविदा कागदपत्रे जमा करून ती सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्वीकारली जाणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या दिवशी कंत्राटदार कार्यालयात कागदपत्रे जमा करायला गेले असता ती स्वीकारण्यात आली नाहीत. त्यानंतर कंत्राटदारांनी गोंधळ घातल्यावर दुसऱ्या दिवशी कागदपत्रे स्वीकृत करण्यात आली.
या प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण झाल्याने दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटनेच्या वतीने दि. 28/08/2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदविण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडचिरोलीचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
बांधकाम विभागाकडून तपासणी केल्यानंतर असे दिसून आले की, या कंत्राट प्रक्रियेत सहभागी कंत्राटदार देशभरात हजारो कोटी रुपयांची कामे करण्यास पात्र असतानाही, एका विशिष्ट कंपनीला हेतुपुरस्सर पात्र ठरवून बाकी कंपन्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर त्या विशिष्ट कंपनीला निविदा उघडून 10 टक्के जास्त दराने कामे देण्यात आली.
मागील 5 वर्षांत नक्षलवादाच्या छायेखाली असताना गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटदारांनी 30 टक्क्यांपर्यंत कमी दराने कामे केली आहेत, याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. सध्या नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असूनही, स्पर्धा असूनही फक्त एका कंपनीला 10 टक्के जास्त दराने कामे देण्यात आली.
या नियमबाह्य निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या पाचही निविदा तात्काळ रद्द करून संपूर्ण चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी ठाम मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष साई बोम्मावार आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या प्रसंगी कंत्राटदार संघटनेचे नेते नितीन वायलालवार, व्ही. बी. बोम्मावार, एल. एल. डोंगरवार, किरण राजापुरे, महेश मोहुरले, व्यंकटस्वामी पोचमपल्ली, धनंजय पडिशालावार आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थुल, नानुभाऊ उपाध्ये, कृष्णा वाघाडे, दिनेश मुजुमदार, लीना विस्वास, लक्ष्मी ताई कन्नाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.