गडचिरोली – शहरातील सार्वजनिक विश्रामगृह (सर्किट हाऊस) परिसरात नवीन विश्रामगृहाचे बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने नियमानुसार परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर झाडे कापल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जवळपास बारा तेरा प्रकारच्या विविध जातींची झाडे, ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे, ती फक्त ₹78,000 रुपयांची रॉयल्टी दाखवून कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या झाडांमध्ये शिशम, सुबाभूळ, कडुनिंब, अंजन यांसारख्या मौल्यवान जातींचा समावेश आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही झाडे गेल्या ३० वर्षांपासून परिसरात वाढलेली होती. वनविभागाच्या नियमानुसार प्रत्येक झाडाची उंची, गोलाई व इतर तपशील नोंदवूनच कापण्याची परवानगी मिळते. मात्र, येथे झाडांची मोगम संख्येतील झाडे,अंदाजे उंची दाखवून सर्व झाडांची परवानगी दिल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी विचारणा केल्यानंतर जिल्हा उपवनसंरक्षक यांनी ही बाब नगरपालिकेच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी सध्या नागपूरला शासकीय कामानिमित्त गेलो असून, तपशीलासाठी ट्री ऑफिसर स्वप्निल खोब्रागडे यांच्याकडे माहिती घेण्यास सांगितले. आमच्या प्रतिनिधींनी चौकशी केली असता खोब्रागडे यांनी ठेकेदाराला 78 हजाराची रॉयल्टी आकारून परवानगी देण्यात आल्याची माहिती मान्य केली.
जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा यांना देखील ही बाब कळविण्यात आली. मात्र त्यांनी सांगितले की, ही घटना त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे ते थेट कारवाई करू शकत नाहीत.
यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आणि महसूल विभाग या तिन्हींकडे बोटे उठत आहेत. नागरिक आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे करत आहेत.