आरमोरी : आरमोरी तालुक्यातील बर्डी परिसरातील नागरिक गेली अनेक दशके राहात असूनही त्यांना अजूनही मूळ मालकी हक्क मिळालेला नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी प्रदेश सदस्या डॉ. संगीता राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
डॉ. राऊत यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, आरमोरी येथील जुनी वस्ती स्थापन झाल्यानंतरच साळवट येथील बर्डी परिसर देखील विकसित झाला आहे. सुमारे ६० वर्षांपासून या भागात नागरिक स्थायिक झाले असून येथे पक्की घरे उभी आहेत. मात्र हा भाग अजूनपर्यंत नगरपरिषद हद्दीत सामाविष्ट झालेला नसल्याने नागरिकांना अद्याप कोणत्याही शासकीय योजना, मालकी हक्कपत्रे किंवा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.
यामुळे येथील रहिवासी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. घरकुल योजना, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत सोयीपासून ते वंचित राहिले आहेत. इतक्या वर्षांपासून वास्तव्य करूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. संगीता राऊत यांनी महसूल मंत्री ना. बावनकुळे यांना तातडीने कारवाई करून झोपडी जंगल हद्दीतून बर्डी परिसर वगळावा आणि नागरिकांना कायमस्वरूपी मूळ मालकी हक्क द्यावेत, अशी ठाम मागणी केली आहे. मंत्री महोदयांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.