रेकी करतांना एका जहाल माओवादीला पोलिसांनी केली अटक…

0
96

गडचिरोली : ताडगाव जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने रेकी करीत असलेल्या एका जहाल माओवादीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. शंकर भिमा महाका (वय ३२, रा. परायनार, ता. भामरागड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल्याचे नाव असून तो भामरागड दलमचा सक्रिय सदस्य आहे. खून, जाळपोळ आणि भुसुरुंग स्फोटासारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी भामरागड उपविभागातील तिरकामेटा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गस्त घालत असताना तो संशयितरीत्या फिरताना आढळून आला. ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो पोलीस अभिलेखावरील जहाल माओवादी असल्याचे स्पष्ट झाले.

 

शंकर महाकावर खून, जाळपोळ यांसह चार गुन्हे दाखल असून, २०२२ मध्ये धोडराज–ईरपनार मार्गावर रस्त्याच्या कामावरील १९ वाहनांची जाळपोळ आणि २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१६ ते २०२१ या काळात त्याने माओवादी संघटनेत जनमिलीशिया सदस्य म्हणून काम केले, तर २०२१ पासून भामरागड दलममध्ये तो सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याला लाहेरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार अटक केली असून, या कारवाईत विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाचा सहभाग होता. या कारवाईनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here