गडचिरोली :
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील पूलखल गावात शेतात काम करणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज (22 सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक महिलेचे नाव ललिता देवराव गेडेकर (वय 56, जात कुणबी, रा. पूलखल, ) असे आहे. त्या सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या असता संशयित आरोपी रामकृष्ण मेश्राम (वय अंदाजे 50, जात ढीवर) याने लोखंडी कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर व गळ्यावर वार करून त्यांचा जागीच खून केला असल्याची शंका व्यक्त करण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले असून सदर आरोपीने अजून पर्यंत खून केल्याचा दोष कबूल केलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
जुन्या वैमनस्यातून खून…
मृतक महिला व तिच्या मुलाने सन 2022 मध्ये संशयित आरोपीच्या मुलाचा खून केला होता. या गुन्ह्यात ललिता गेडेकर व त्यांचा मुलगा मागील तीन वर्षांपासून तुरुंगात होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटल्याचे कळताच आरोपी रामकृष्ण मेश्राम याने आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आज रागाच्या भरात महिलेचा खून केला, अशी चर्चा पुलखल गावात सुरू झालेली दिसून आली होती.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलिसांकडून सुरू आहे.