गडचिरोली पोलिस दलाकडून “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत ७२ वे सार्वजनिक वाचनालय उद्घाटन…

0
19

 

पोस्टे मन्नेराजाराम हद्दीतील अतिदुर्गम मौजा जिजगाव येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन…

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला व नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षण व बौद्धिक कलागुणांना वाव देणे तसेच वाचनाची आवड आणि स्पर्धा परीक्षांविषयी ओढ निर्माण करणे या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलाने “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत भामरागड उपविभागातील मौजा जिजगाव येथे ७२ व्या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 

१३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या वाचनालयाच्या निर्मितीसाठी पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी-अंमलदार तसेच गावकऱ्यांनी श्रमदान व लोकवर्गणीद्वारे योगदान दिले.

 

कार्यक्रमाला ५०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून, वाद्य वाजवत आणि राष्ट्रध्वज फडकवत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीद्वारे वाचनाची आवड वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

 

नवीन वाचनालयात स्वतंत्र अभ्यासिका, टेबल-खुर्च्यांची बैठक व्यवस्था, पुस्तकांचे कपाट व इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होणार असून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमधील सहभाग वाढेल.

 

सन २०२३ पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७१ वाचनालये स्थापन झाली आहेत. त्याचा लाभ ८००० हून अधिक युवक-युवती व नागरिकांनी घेतला असून, आतापर्यंत २०५ विद्यार्थी विविध शासकीय विभागांत भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. या नागरिकृती उपक्रमांमुळे मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातून माओवादी संघटनांमध्ये एकही तरुण भरती झालेला नाही.

 

या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, “या वाचनालयाचा विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. येथून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, त्यांच्या भविष्यासाठी हे वाचनालय उपयुक्त ठरावे, हा आमचा उद्देश आहे. गडचिरोली पोलिस दल केवळ माओवादीविरोधी लढा देत नाही तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे.”

 

कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अमित सिन्हा, पोस्टे मन्नेराजारामचे प्रभारी अधिकारी शुभम शिंदे, एसआरपीएफ ग्रुप ४ नागपूरचे पो.उ.नि. प्रशांत नरखेडे, स्थानिक सरपंच, पोलिस पाटील, पत्रकार, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, प्रभारी अधिकारी शुभम बळवंत शिंदे, पो.उ.नि. शुभम मिलींद शिंदे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. चंद्रकांत शेळके तसेच इतर अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here