गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना 400 mg ब्रुफेन कंपनी च्या गोळ्या खायला लावल्याने 70 विद्यार्थांची प्रकृती बिघडल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आरोग्य विभागाचे फिरते रुग्णालयाची रुग्णवाहिका आली होती,त्या रुग्णवाहिकेतील आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी 130 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 गोळ्या वाटल्या आणि रोज 1 गोळी खायला सांगितली असून मंगळवारी विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता च्या सुमारास जेवणानंतर पहिली गोळी खाताच जवळपास 70 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांना उलट्या, मळमळ आणि ताप आल्यानंतर लगेच शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालया चामोर्शी आणि गडचिरोली येथे पाठविण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे जवळपास 60 विद्यार्थ्यांनी मुद्दाम ती औषध खाल्ली खाली नव्हती त्या विद्यार्थ्यांना काहीच झालेले नव्हते.अगोदर वाटले होते की जेवणात काही विषबाधा झाली असेल पण सर्व जेवण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त गोळ्या खाल्लेल्या विद्यार्थ्यांचीच तब्येत अचानक बिघडू लागल्याने उर्वरित 60 विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ घेतलेल्या गोळ्या फेकून दिल्याने नशिबाने त्यांना आज काहीच झाले नाही. ही घटना काल मंगळवारी सकाळी 10 वाजता घडली होती परंतु ह्या घटनेची माहिती आज दुपार पर्यंत कुठेही मिळाली नसल्याने शाळेतील शिक्षक, शिक्षण अधिकारी,आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग यांनी कमालीची गुप्तता का पाळली होती हे संशयित वाटत आहे.
सामान्य रुग्णालयाचे अती दक्षता विभागात तापामुळे भरती असलेले युवा सेनेचे अध्यक्ष पवन गेडाम यांनी जेव्हा भरती झालेल्या विद्यार्थ्यांना बघितले तेव्हा च त्यांनी ताबडतोब समाजकल्याण अधिकारी व शहरातील पत्रकारांना रुग्णालयातूनच माहिती दिल्यामुळे या घटनेची माहिती समोर आली होती.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन मडावी यांना युवा सेनेचे अध्यक्ष पवन गेडाम यांनी माहिती दिल्यानंतर ते आज दुपारी सामान्य रुग्णालयात विद्यार्थ्यांची प्रकृती पहायला आले होते.त्यांना उशिरा येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मला आज सकाळी च माहिती मिळाली असून मी कार्यालयातील काही कामांमध्ये गुंतल्यामुळे मी स्वतः दुपारी दोन वाजता सामान्य रुग्णालयात जाऊन सर्व 12 विद्यार्थींची पाहणी केली असून त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून बाकी चामोर्शी सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मी सायंकाळी जाऊन बघितल्यानंतर सर्व माहिती आपल्याला देऊ शकतो असे सांगितले. हा घटनेला आरोग्य विभागाचे फिरते पथकातील कर्मचारी जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून अशा प्रकारच्या गोळ्या आरोग्य विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीत दिल्या पाहिजे होत्या असे बोलून त्यांनी आपल्या विभागाची भूमिका स्पष्ट केली होती. या घटनेची माहिती आता पूर्ण चौकशी झाल्यावरच पोलिसांच्या वतीने कोणती कारवाई करण्यात येईल यावर आता चर्चा या परिसरात सुरू झाली आहे.