Home राजकीय गडचिरोलीत उबाठा शिवसेनेत राडा; जिल्हाप्रमुखपद बदलानंतर शिवसेना कार्यालयात तोडफोड, पोलिसांत तक्रार…

गडचिरोलीत उबाठा शिवसेनेत राडा; जिल्हाप्रमुखपद बदलानंतर शिवसेना कार्यालयात तोडफोड, पोलिसांत तक्रार…

0
334

 

 

गडचिरोली, दि. १३ जून : गडचिरोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी शनिवारी उघडपणे समोर आली. जिल्हाप्रमुखपदात झालेल्या बदलानंतर विद्यमान आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तोडफोड झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पक्षाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलात जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी बदलण्यात आली. त्यानंतर पक्षातील दोन गट आमनेसामने आले. वाद वाढत जाऊन काही कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तोडफोडीत काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आलेले जिल्हाप्रमुखांचे नवीन केबिन, कार्यालयातील टीव्ही, एसी, केबिनच्या छतावर करण्यात आलेले पीओपी काम, विद्युत फिटिंग तसेच इतर कार्यालयीन साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

 

राजकीय जाणकारांच्या मते, हा वाद केवळ जिल्हाप्रमुखपद बदलाचा नसून अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाच्या संघर्षाचा परिपाक आहे. माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके आणि माजी युवा सेना जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांच्यामध्ये संघटनात्मक नेतृत्व आणि प्रभावक्षेत्रावरून दीर्घकाळापासून मतभेद असल्याची चर्चा पक्षात सुरू होती. मात्र हा संघर्ष इतक्या टोकाला जाईल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती.

 

या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक शिस्त, वैचारिक बांधिलकी आणि राजकीय परिपक्वता कमी होत चालली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. हिंदुत्ववादी आणि शिस्तबद्ध संघटना म्हणून प्रतिमा असलेल्या पक्षाच्या कार्यालयातच अशा प्रकारची तोडफोड होणे हे पक्षासाठी निश्चितच चिंतेचे कारण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, कोणत्याही पक्षातील अंतर्गत मतभेद लोकशाही मार्गाने आणि संघटनात्मक चौकटीत सोडवले जाणे अपेक्षित असते. मात्र पदांवरील बदल आणि वैयक्तिक वर्चस्वाच्या संघर्षातून जर कार्यालयांमध्ये तोडफोड आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्याचा फटका संपूर्ण पक्षाच्या प्रतिष्ठेला बसतो.

 

दरम्यान, या घटनेचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईतील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लागले आहे. पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेते या प्रकरणाची कितपत दखल घेतात, संबंधितांवर संघटनात्मक कारवाई करतात का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती भूमिका घेतात, याकडे कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

या प्रकरणात नवनियुक्त जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके आणि त्यांच्या समर्थकांविरोधात शिवसेना कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कार्यालयातील साहित्याचे नुकसान आणि घडलेल्या घटनेचा सविस्तर उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

 

वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडून या प्रकरणात कोणती अधिकृत कारवाई करण्यात आली आहे किंवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, याबाबतची स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असल्याचे समजते.

 

गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणात या घटनेने नव्या वादाला तोंड फोडले असून हा विषय केवळ पक्षांतर्गत संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. संघटनात्मक शिस्त, राजकीय संस्कृती आणि नेतृत्वाच्या जबाबदारीबाबत नव्याने चर्चा सुरू करणारी ही घटना ठरली आहे. आता पोलिस तपास आणि पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here