Home ब्रेकिंग न्यूज वैनगंगा पुलावरून महिलेची आत्महत्या; ओळख अद्याप पटली नाही…

वैनगंगा पुलावरून महिलेची आत्महत्या; ओळख अद्याप पटली नाही…

0
617

गडचिरोली : आज दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलावरून एका महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुलावरून नदीत उडी घेत असताना काही प्रवाशांनी हा प्रकार पाहिला होता. त्यावेळी नागरिकांनी आरडाओरड करून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित कोणालाही पोहता येत नसल्याने महिलेला मदत करता आली नाही. काही वेळातच महिला नदीच्या पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटना वैनगंगा नदीच्या पुलाच्या पलीकडील भागात घडली असून तो परिसर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने सावली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रियेसाठी तो मूल सामान्य रुग्णालय, जिल्हा चंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे. सध्या मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान असून तिचा वर्ण सावळा-काळपट आहे. महिलेने लालसर-जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. परिसरातील गावांमध्ये विचारपूस करूनही संबंधित महिला कोणाच्या ओळखीची नसल्याचे समोर आले आहे.

महिलेची ओळख पटविण्यासाठी सावली पोलीस स्टेशनकडून तपास सुरू असून नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ओळख पटल्यावर नातेवाईकांच्या संमतीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here