Home ब्रेकिंग न्यूज सुट्टीच्या दिवशी रेती तस्करीचा सुळसुळाट? प्रशासनावर संशय, तहसीलदारांची कारवाई…राजकीय नेता करतोय दबावतंत्राचा...

सुट्टीच्या दिवशी रेती तस्करीचा सुळसुळाट? प्रशासनावर संशय, तहसीलदारांची कारवाई…राजकीय नेता करतोय दबावतंत्राचा वापर…?

0
622

 

गडचिरोली : शनिवार-रविवारच्या सरकारी सुट्ट्यांचा फायदा घेत नदीघाटांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे धक्कादायक चित्र गडचिरोली शहर व परिसरात समोर येत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असते, याचाच गैरफायदा घेत रेती तस्करांनी जणू काही “मोहीम” राबविल्याप्रमाणे शेकडो ब्रास रेतीची चोरी केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

शहरालगतच्या विविध रेती घाटांवरून शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात टिप्परद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’ घेऊन या तस्करीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोपही होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महसूल मंत्र्यांच्या इशाऱ्याचे काय…?

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मागील गडचिरोली दौऱ्यात रेती तस्करीविरोधात कडक भूमिका घेतली होती. “यापुढे रेती तस्करी करताना आढळलेल्या वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई करून सोडले जाणार नाही, तर परिवहन नियम व महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला होता.

मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही फरक पडलेला दिसत नसल्याने महसूल मंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच राहिली का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेती तस्कर आणि काही भ्रष्ट अधिकारी यांनी या इशाऱ्यालाच जणू आव्हान दिले आहे काय, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही गडचिरोली-आरमोरी मार्गावरील सुमानंद मंगल कार्यालयाजवळ एक मोठा टिप्पर (क्रमांक MH-33 T 7567) बिगर रॉयल्टी रेती वाहतूक करताना आढळून आला. तहसीलदार सागर कांबळे यांनी तत्काळ वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाकडे कोणतीही वैध रॉयल्टी कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले.

सदर टिप्परमध्ये सुमारे १० ते १२ ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित वाहन तहसील कार्यालयात जमा करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी एम. अरूण यांच्याशी संपर्क साधला असता, “सदर कारवाईची माहिती तहसीलदारांकडून घेत आहे. संबंधित वाहनावर रेती चोरीप्रकरणी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तहसीलदार सागर कांबळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मंडळ अधिकारी राजू शिडाम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदर क्रमाण mh 33 T 7567 या वाहनावर तहसीदार साहेबांनी कारवाई केली असून सदर वाहन सोबत कोणत्याही प्रकारची रायल्टी दिसून आलेली नाही.

सत्ताधारी मोठ्या नेत्याच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा…

या कारवाईनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या नेत्याने या प्रकरणात सक्रिय हस्तक्षेप केल्याच्या चर्चेमुळे वातावरण अधिकच तापले आहे. रेती तस्करीच्या मागे राजकीय आश्रय तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे महसूल मंत्र्यांचे कडक निर्देश आणि दुसरीकडे प्रत्यक्षात सुरू असलेली अवैध वाहतूक यामुळे गडचिरोलीतील रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने ठोस आणि पारदर्शक कारवाई करून या अवैध धंद्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here