Home ब्रेकिंग न्यूज पुराडा-हेटी परिसरातील अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; युवती सेनेच्या नेतृत्वात पोलीस उपविभागीय कार्यालयावर...

पुराडा-हेटी परिसरातील अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; युवती सेनेच्या नेतृत्वात पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा…

0
244

 

कुरखेडा (जि. गडचिरोली) – कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुराडा, हेटी, वाघदरा, रामगड, जामटोला, कुंभीटोला आणि येडापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शेकडो महिलांनी संतप्त होत थेट पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा युवती सेना (शिंदे गट) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या तसेच कथितरीत्या नकली दारूची विक्री होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या दारूमुळे अनेक तरुण व घरातील कर्ते पुरुष व्यसनाधीन झाले असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. काही प्रकरणांमध्ये दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महिलांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेक वेळा पुराडा पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली होती. तक्रारीनंतर काही दिवस दारूविक्री बंद राहते; मात्र त्यानंतर पुन्हा अवैध दारूविक्री सुरू होते. या प्रकारामुळे गावागावांत कौटुंबिक वाद, मारहाण आणि आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. घरातील कमावते पुरुष व्यसनाधीन झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा संताप महिलांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रा. कु. उमाताई चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा येथील पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले हे पोलीस भरतीच्या कामानिमित्त गडचिरोली येथे गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत कुरखेडा पोलीस निरीक्षक श्री वाघ यांनी निवेदन स्वीकारले.

दरम्यान, युवती सेना जिल्हाध्यक्ष उमाताई चंदेल यांनी दूरध्वनीद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधून अवैध दारूविक्रीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भोसले यांनी अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तथापि, जर अवैध दारूविक्रेत्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजारो महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उमाताई चंदेल यांनी दिला.

या आंदोलनात कुरखेडा शहरप्रमुख अश्विनीताई पिंपळकर, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सोनी गंगाचौधरी, देवकी सोनवाणी, सलेंद्री सोनवणे, शेवंता सहाळा, लता दखणे, जास्वंदा उसेंडी, जिजाबाई होळी, रसिका मडावी, शालू दरवडे यांच्यासह शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुराडा-हेटी परिसरातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न आता चिघळला असून प्रशासन यावर कितपत प्रभावी कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here