गडचिरोली :
गडचिरोली नगरपरिषद सभापती पदांच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सर्वच महत्त्वाच्या समित्यांवर आपली सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकतर्फी यश संपादन केले आहे. या दणदणीत विजयामागे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांची निर्णायक भूमिका, काटेकोर नियोजन व प्रभावी नियोजन महत्त्वाचे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नगरपरिषदेत सभापती पदांच्या वाटपात मुक्तेश्वर काटवे यांची आरोग्य सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्याकडे अर्थ सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनिल कुणघाडकर यांची बांधकाम सभापती, तर हर्षल गेडाम यांची शिक्षण सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे लीलाधर भरडकर यांची पाणीपुरवठा सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा कन्नमवार यांची महिला व बालकल्याण सभापती, तर शिल्पा हेमके यांची महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आणि जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी महायुतीतील समन्वय अत्यंत प्रभावीपणे साधत नगरसेवकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेली रणनीती, संघटनात्मक ताकद आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे ही निवडणूक महायुतीसाठी पूर्णतः एकतर्फी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीच्या वेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निबोळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या या घवघवीत विजयामुळे गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना वेग मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




