धानोरा (गडचिरोली) | प्रतिनिधी
धान कापणी व मळणीच्या हंगामात गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावात धान मळणी सुरू असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकून एका ३० वर्षीय निलंबित वनरक्षकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन देवराम हलामी असे मृतकाचे नाव असून ही घटना बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हलामी हे मूळचे ईरुपटोला गावाचे रहिवासी होते. बुधवारी ते मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणीच्या कामासाठी गेले होते. थ्रेशर मशीन सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट सुरू असलेल्या मशीनमध्ये ओढले गेले. काही क्षणांतच त्यांच्या शरीराचा अर्ध्याहून अधिक भाग मशीनमध्ये अडकला. मशीनचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
हा अपघात इतक्या अचानक आणि वेगाने घडला की घटनास्थळी उपस्थित असलेले सहकारी मजूर काहीही करू शकले नाहीत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मशीनमध्ये खेचले जात असल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला, मात्र त्यांना वाचवणे अशक्य ठरले.
निलंबनानंतर करत होते मजुरी…
सचिन हलामी हे यापूर्वी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, लाकूड तस्करीच्या एका गंभीर प्रकरणात नाव आल्याने त्यांच्यावर दोन वेळा निलंबनाची कारवाई झाली होती. निलंबनानंतर ते गावातच वास्तव्यास होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी उमाजी जनबंधू यांच्या ट्रॅक्टरवर चालक व हमाल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
सचिन यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अशा भीषण अपघातात गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा उपपोलीस स्टेशन येथे याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्घटनेमुळे शेतमजुरी व कृषी यांत्रिकीकरणादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




