Home विशेष ❝गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शहराच्या प्रथम नागरिकालाच डावलले❞ ❝कोणता प्रोटोकॉल? – विद्यापीठ...

❝गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शहराच्या प्रथम नागरिकालाच डावलले❞ ❝कोणता प्रोटोकॉल? – विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह❞

0
254

गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ येत्या बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असला, तरी या सोहळ्याआधीच विद्यापीठ प्रशासनाच्या प्रोटोकॉल बाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नव्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचे नाव निमंत्रित अतिथींच्या यादीतून वगळण्यात आल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र चर्चेला उधाण आले आहे.

या दीक्षांत समारंभाबाबत माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उपस्थित पत्रकारांनी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांना निमंत्रण का देण्यात आले नाही, असा थेट सवाल केला. त्यावर कुलगुरूंनी “प्रोटोकॉलनुसार अतिथी निवडले जातात. नगराध्यक्षांना अतिथी म्हणून बोलावता येत नाही, मात्र सन्मानाने निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येईल,” असे उत्तर दिले.
❝शहराचा प्रथम नागरिक – केवळ निमंत्रणापुरता?❞
कुलगुरूंच्या या उत्तरानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमावलीनुसार नगराध्यक्ष/महापौर हे शहराचे प्रथम नागरिक मानले जातात. शहराच्या हद्दीत होणाऱ्या शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विद्यापीठांच्या कार्यक्रमात प्रथम नागरिकांना सन्मानाने आमंत्रित करणे ही शासनमान्य परंपरा आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने कोणता नवीन प्रोटोकॉल शोधून काढला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठ ‘खाजगी’ संस्था नाही
गोंडवाना विद्यापीठ ही राज्य शासनाच्या अधिनियमांतर्गत स्थापन झालेली सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कार्यक्रम पूर्णतः शासकीय प्रोटोकॉलच्या चौकटीत येतात. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखाला डावलणे हे प्रोटोकॉलच्या भावनेला विरोधात असल्याचे मत प्रशासनातील जाणकार व्यक्त करत आहेत.

मुख्य अतिथी नसला तरी सन्मान अपेक्षित
नगराध्यक्षांना मुख्य अतिथी करणे बंधनकारक नसले, तरी—
विशेष अतिथी म्हणून उपस्थिती
मंचावर मानाचे स्थान
औपचारिक सत्कार
हे किमान सन्मान देणे अपेक्षित असते. मात्र येथे फक्त निमंत्रण पत्रिकेपुरते औपचारिकता ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे.
प्रोटोकॉल म्हणजे काय?
प्रोटोकॉल म्हणजे— लोकशाही व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींच्या पदाचा सन्मान,
जनतेच्या प्रतिनिधित्वाचा आदर
आणि प्रशासकीय शिस्त.
असे असताना “प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्षांना बोलावता येत नाही” हा दावा लेखी शासकीय नियमांशिवाय ग्राह्य धरता येत नाही, असे मत व्यक्त होत आहे.

❝प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप❞
जर इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांना मंचावर स्थान दिले जात असेल आणि शहराच्या प्रथम नागरिकाला डावलले जात असेल, तर तो प्रकार प्रोटोकॉल उल्लंघन ठरतो का? असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

कुलगुरूंनी यासंदर्भात “नगराध्यक्षांना सन्मान देता येईल का, याबाबत पुन्हा खातरजमा करू” असे सांगितले असले, तरी तोपर्यंत हा मुद्दा राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

लोकशाही मूल्यांचा प्रश्न…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखांचा सन्मान ही केवळ औपचारिक बाब नसून, तो लोकशाही मूल्यांचा अविभाज्य भाग आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शहराच्या प्रथम नागरिकांना डावलण्यामागे नेमका कोणता प्रोटोकॉल आहे, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here