आज जेष्ठ नागरिक दिवस असल्याचं कळतं! या निमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेले असणार! लोक कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात. काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. . हारतुरे देऊन मान्यवरांचा सन्मान केला जातो. मंत्री…. संत्री कार्यक्रमात असेल तर तो जेष्टांसाठी असलेल्या योजनांचा पाढा सर्वांसमोर वाचतो. योजनांची अंमलबजावणी होते नाही होत याबद्दल काही एक बोलत नाही…..
मोठमोठ्या सिटीतून अनेकजेष्ठ नागरिक एकट्यादुकट्याने राहतात. काळजी घ्यायला कुणी नसतं. व्यक्ती खूपच आजारी असेल तर स्वतः बँकेत जाऊन पैसे काढू शकत नाही. अशा कठीण प्रसंगी
स्वतः बँक अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला घरपोच सेवा देण्याचा नियम आहे पण खरंच हा नियम पाळला जातो का हा सवाल आहे!
सत्तेत बसलेले अनेक मंत्री संत्री साठीत पोहचलेले असतात. पण त्या पैकी कुणीच जेष्ठ लोकांसाठी काही करायला तयार होत नाही. कारण स्पष्ट आहे त्यांचं स्वतःचं आयुष्य मोठ्या मजेत चाललेलं असतं. ज्या वयात सर्वसामान्य माणूस नाना विपत्ती नि कष्ट भोगतो त्या वयात ही मंडळी ऐशोआरामाची जिंदगी जगत असते. वृद्ध लोकांच्या समस्या…. त्यांचे प्रश्न नक्की काय आहेत त्यांना काही एक माहीत नसतं.
वृद्ध लोक प्रेम नि आपुलकीसाठी आसुसलेले असतात. त्यांचा आदर सन्मान नका करू काही हरकत नाही… पण निदान त्यांना कुत्र्या मांजरासारखं तरी वागवू नका ना! ज्यांनी हाडाची काडं करून तुम्हा आम्हाला वाढवलं… इथपर्यंत आणून पोहचवलं त्याची थोडी तरी जाण असू दे रे भावा!
.