गडचिरोली भाजपात अंतर्गत वाद चव्हाट्यावर; निवडणूक व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह…
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी, निर्णयप्रक्रियेतील अपारदर्शकता आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाचा गंभीर आरोप भाजपाचे प्रदेश सचिव रमेश विठोबाजी भुरसे यांनी केला आहे. शब्द देऊनही स्वीकृत सदस्यपद नाकारण्यात आल्याने पक्षातील लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
रमेश भुरसे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ५ मधून त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्या वेळी “निवडणूक लढू नका, तुम्हाला स्वीकृत सदस्यपद देण्यात येईल” असा ठाम शब्द देण्यात आला होता. हा शब्द देताना माजी खासदार अशोकजी नेते, आमदार मिलींदजी नरोटे, बाबुरावजी कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी आणि प्रमोदजी पिपरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्षात स्वीकृत सदस्यपद न देता शब्दभंग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
चुकीच्या उमेदवारांमुळे तीन जागांवर पराभव…
भुरसे यांनी निवडणूक रणनीतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. गोविंद सारडा यांच्या निर्णयांमुळे तीन उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोप करत, चुकीचे उमेदवार दिल्यामुळे पक्षाला फटका बसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १ आणि ५ मध्ये उमेदवार पराभूत झाले असतानाही काही जण स्वतःला “विजयाचे शिल्पकार” म्हणून मिरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्येही उमेदवार निवडून न आल्यावरही विजयाचे श्रेय घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
२१ वरून १५ नगरसेवकांवर घसरण…
मागील निवडणुकीत भाजपाचे २१ नगरसेवक निवडून आले होते, मात्र यावेळी ही संख्या १५ वर घसरली आहे. तरीही आत्मपरीक्षण न करता विजयाचा डंका वाजवला जात असल्याची टीका भुरसे यांनी केली.
निवडणूक प्रभारी नियुक्तीनंतर गटबाजी वाढली…
चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांची गडचिरोली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून पक्षात प्रचंड गटबाजी सुरू झाल्याचा आरोपही भुरसे यांनी केला. सध्या पक्षात सरळ दोन-तीन गट निर्माण झाले असून, “बंटी भांगडीया आमचे गॉडफादर आहेत, आम्हाला कोणी वाकडे करू शकत नाही” अशी भावना काही कार्यकर्त्यांमध्ये तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेतील गटनेता निवडताना कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही. कोणतीही बैठक किंवा चर्चा न करता निर्णय लादण्यात आल्याचा आरोप भुरसे यांनी केला.
ज्यांनी गडचिरोलीत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, बहुजन समाजाला भाजपासोबत जोडण्याचे काम केले, अशा जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे आज दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तेली समाज भाजपाशी जोडण्याचे श्रेय नाकारले…
तेली समाज पूर्वी काँग्रेससोबत होता. तो समाज भाजपासोबत जोडण्याचे मोठे काम रमेश भुरसे, बाबुराव कोहळे आणि प्रमोद पिपरे यांनी केले. आज संपूर्ण तेली समाज भाजपासोबत आहे. मात्र, या कार्याचे श्रेय देण्याऐवजी आज त्यांनाच विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भुरसे यांनी केला.
भाजपामध्ये वाढत चाललेली गटबाजी, निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय आणि निर्णयप्रक्रियेतील अपारदर्शकता याची पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही रमेश भुरसे यांनी दिला आहे.




