Home सामाजिक महागाव येथे सिकलसेल (अरुणोदय) मोहिमेचा दणदणीत शुभारंभ… सरपंचांनी स्वतः तपासणी करून...

महागाव येथे सिकलसेल (अरुणोदय) मोहिमेचा दणदणीत शुभारंभ… सरपंचांनी स्वतः तपासणी करून दिला जनजागृतीचा ठोस संदेश…

0
229

 

महागाव :

सिकलसेल आजाराविरोधात शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “सिकलसेल (अरुणोदय) मोहिमेचा” शुभारंभ दि. १५ जानेवारी २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव येथे उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या मोहिमेचा शुभारंभ मा. सरपंच सौ. वंदना प्रवीण दुर्गे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सरपंचांनी स्वतःची सिकलसेल तपासणी करून नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्का ऊइके व डॉ. लुबना हकीम, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना सिकलसेल आजाराची माहिती देत तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये AS व SS पॅटर्न आढळून आलेल्या रुग्णांची नोंद करून त्यांना योग्य उपचार, समुपदेशन, नियमित तपासणी व आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन करताना डॉ. अल्का ऊइके व डॉ. लुबना हकीम यांनी सिकलसेल आजाराची कारणे, लक्षणे, निदानाची प्रक्रिया तसेच वेळेवर उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान कसे सुधारू शकते, याविषयी सविस्तर माहिती दिली. समाजामध्ये या आजाराबाबत असलेली भीती, गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात मा. सरपंच सौ. वंदना प्रवीण दुर्गे यांनी सिकलसेल निर्मूलनासाठी शासनाच्या उपक्रमांना सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, प्रत्येक नागरिकाने तपासणी करून घेऊन स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लाभार्थ्यांनी सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी व सिकलसेल (अरुणोदय) मोहिमेला सक्रिय सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here