दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 | गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अवैध अंमली पदार्थ तस्करीवर सतत लक्ष ठेवत पोलिसांनी आज आणखी एक मोठी कारवाई केली. कुरखेडा उपविभागातील मालेवाडा हद्दीत पोलिसांनी छापा टाकत 1 कोटी 19 लाख 83 हजार रुपये किमतीचा प्रचंड प्रमाणात गांजा जप्त केला असून, या प्रकरणात एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीमुळे ही कारवाई शक्य झाली.
माहितीनुसार, मौजा हु-ऱ्ह्यालदंड येथील एक व्यक्ती आपल्या घराच्या सांदवाडीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करत असल्याचे समोर आले होते.
या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
पोलिसांनी संशयित कृष्णा हरसिंग बोगा (वय 41 वर्षे, रा. हु-ऱ्ह्यालदंड) यांच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, घराच्या सांदवाडीत अत्यंत नीटनेटकेपणे केलेली गांजाच्या वनस्पतींची लागवड आढळून आली.
तपासणी दरम्यान हिरव्या रंगाची पानं, फुलं, बोंडं व बिया असलेल्या कॅनबिस वनस्पती मिळून आलेला एकूण 239.66 किलो गांजा जप्त करण्यात आला.
जप्तीची एकूण किंमत – 1,19,83,000 रुपये..
पोलिसांनी जागेवरच पंचासमक्ष केलेल्या मोजणी व गणनेनुसार जप्त केलेल्या गांजाची बाजार किंमत तब्बल एक कोटी एकोणविस लाख त्र्याऐंशी हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.ही कारवाई अलीकडच्या काळातील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक म्हणून नोंदली जात आहे.
विक्रीसाठी गांजाची लागवड – आरोपीची कबुली…
प्राथमिक तपासात आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशानेच आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले आहे.या शेतीसाठी वापरलेली विविध साधनं व साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल…
सदर प्रकरणी पुराडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 111/2025 कलम 8(सी), 20(बी), 20(बी)(II)(C) — एनडीपीएस कायदा 1985 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश नायकवाडी (पोमके, मालेवाडा)यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आणखी कोणी या जाळ्यात सामील आहे का याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.




