Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत नव्या सिग्नलचा गोंधळ; बसवूनही १०-१२ दिवसांपासून बंद, वाहतूक विभाग त्रस्त…

गडचिरोलीत नव्या सिग्नलचा गोंधळ; बसवूनही १०-१२ दिवसांपासून बंद, वाहतूक विभाग त्रस्त…

0
378

गडचिरोली | प्रतिनिधी
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी गडचिरोली नगरपालिकेच्या वतीने आयटीआय चौक तसेच न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाच्या चौकात नवीन सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली आहे. मात्र सिग्नल बसवून तब्बल १० ते १२ दिवस उलटूनही ते अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नल बसविण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्यांची कनेक्टिव्हिटी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सिग्नल सुरू होऊ शकलेले नाहीत. परिणामी, शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांना हातानेच वाहतूक सुरळीत ठेवावी लागत आहे.
गडचिरोली शहरात आधीच वाहतूक व्यवस्थेची अवस्था बिघडलेली आहे. अशा परिस्थितीत नवीन सिग्नल वेळेत सुरू न होणे ही प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा दर्शवणारी बाब मानली जात आहे. एकीकडे वाहतूक विभाग वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
सध्या शहरातील इंदिरा गांधी चौक येथेच सिग्नल व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे, तर इतर दोन महत्त्वाच्या चौकांवरील सिग्नल केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “सिग्नल बसवले, पण ते सुरू करायला इतका विलंब का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासोबतच, शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहतूक नियमांची योग्य माहिती मिळावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. यासाठी वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, हे सिग्नल कार्यान्वित करण्यासाठी नगरपालिकेला अजून किती दिवस लागणार? शहरवासीयांना या समस्येतून लवकरच दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here