गडचिरोली (प्रतिनिधी):
गडचिरोली शहराजवळील चंद्रपूर रोडवरील हॉटेल सुकुन परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोरक्षकांवर लोखंडी रॉड आणि बंदुकीच्या धाकावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने शनिवार, 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.45 ते 3 वाजेदरम्यान घडली होती. घटनेचे फिर्यादी डॉ. रौनक फेबुलवार आणि त्यांचे मित्र हरिष माकडे, अंकुश पवार, नितेश धाईत आणि लक्ष कोडाप हे गडचिरोली-चंद्रपूर रोडवरून जात असताना त्यांना गो-तस्करी करणारी एक पिकअप गाडी दिसली. त्यांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला असता, गाडीने त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि काही अंतरावर थांबली.
दरम्यान, क्रेटा आणि टाटा कर्व या दोन गाड्यांमधून आलेल्या 7 ते 8 जणांनी लोखंडी रॉड व बंदुकीच्या धाकावर हल्ला चढविला. हल्ल्यात हरिष माकडे आणि नितेश धाईत गंभीर जखमी झाले. आरोपींनी “इसको गाड़ी में डालो, गोली मारो” असे म्हणत धमकी दिल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे.
अटक आरोपी :
1. वसीम रज्जाक कुरेशी (30), रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर
2. अब्दुल जुबेर अब्दुल रशीद (35), रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर
3. सलिम रहिमान अब्दुल (37), रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर
तर चौथा आरोपी सागर वाळके (25), रा. सावली, जि. चंद्रपूर सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अटक आरोपींकडून विचारपूस केल्यानंतर तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, आरोपी अब्दुल जुबेर याने जखमीचा मोबाईल फोन चोरून आपल्या नातेवाईकाच्या घरात लपविल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला आहे.
तसेच आरोपी वसीम कुरेशीने लोखंडी रॉड चंद्रपूर रोडलगतच्या नाल्यात फेकल्याची कबुली दिली असून, तोही पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी हे गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तलीचे आंतरराज्यीय रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. तेलंगणा व हैद्राबाद येथे गोवंश तस्करी करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी जाळे उभारल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना 9 नोव्हेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. ए. पठाण मॅडम यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी 5 दिवस वाढीव पोलीस कस्टडीची मागणी केली होती.
सरकार पक्षातर्फे अभियोजक खोब्रागडे, तर आरोपींच्या बाजूने ऍड. मोहनीश शर्मा यांनी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने शनिवार, 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत 3 दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिसांनी अजूनही फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला असून, गुन्ह्यात वापरलेली बंदूक, वाहने आणि अन्य पुरावे हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील अवैध गो-तस्करीच्या टोळ्यांवर कारवाईची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.




