Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून दारूचा साठा जप्त – गडचिरोलीत खळबळ; पोलिसांवर राजकीय...

गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून दारूचा साठा जप्त – गडचिरोलीत खळबळ; पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी…

0
1462

 

गडचिरोली (प्रतिनिधी) –

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वालसरा या गावात भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्या घरातून तब्बल ४५ पेट्या देशी दारू (किंमत सुमारे ३ लाख ६० हजार रुपये) जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईनंतर संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाच्या घरी देशी दारूचा साठा…

 

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, वालसरा गावात रामचंद्र भांडेकर हे घरात अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी पहाटे एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला भांडेकर यांनी घरझडतीस नकार दिला. मात्र पंचांच्या उपस्थितीत झडती घेतली असता, ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ४५ पेट्या देशी दारू आढळल्या, ज्याची बाजारमूल्य सुमारे ३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.

 

 निवडणुकीपूर्वी साठा?

 

या दारूचा साठा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होता का, अशी चर्चा गावात जोर धरत आहे. रामचंद्र भांडेकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षांचे भाऊ आणि माजी महिला जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या दीर असल्याने राजकीय रंग चढला आहे.

 

पोलिसांनी नाकारली कारवाई, पण गावकऱ्यांनी केला खुलासा…

 

घटनेनंतर काही पत्रकारांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि चामोर्शी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक डोंब यांना विचारले असता त्यांनी “अशी कोणतीही कारवाई झालेली नाही” असे सांगितले. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून सांगितले की, पोलिसांनी पहाटे छापा टाकून दारू जप्त केली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षकांवर राजकीय दबावाखाली कारवाई दडपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

 काँग्रेसकडून पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी…

 

या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून,“दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी दारू सापडणे हे गंभीर आहे. पोलिस निरीक्षकांनी सत्य दडवले, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,” अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.

 

ही घटना बाहेर आल्यानंतर भाजपच्या गोटात मोठी हालचाल सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दावेदारी करणाऱ्या भांडेकर यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून दारू जप्त होणे ही गंभीर बाब असून, पोलिसांवर राजकीय दबावाचे सावट असल्याने या घटनेमागील सत्य बाहेर येण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here