सातबारा कोरा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत व पेन्शन वाढीसाठी राज्यभरातील शेतकरी होणार शामिल…
गडचिरोली :
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि थकलेल्या आश्वासनांविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २८ ऑक्टोबरपासून नागपूर येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू होणार असून या लढ्याचे नेतृत्व मा. बच्चू कडु, डॉ. अजित नवले आणि मा. राजू शेट्टी करणार आहेत.
या आंदोलनात शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठविला जाणार आहे. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा…
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची व योग्य नुकसानभरपाई द्या…
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना २५०० रुपये प्रति महिना पेन्शन द्या…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून तातडीची आर्थिक मदत द्या…
धान कापणीनंतर रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा,धानाला किमान ३५०० रुपये हमीभाव मिळावा
काबीज शेतकऱ्यांना जमीनपट्टे द्यावेत…आरमोरी नगरपालिका क्षेत्रात रोजगार हमीची कामे सुरू करा,शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा
या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र यांचा सक्रीय पाठिंबा मिळाला असून, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २००० शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
ही माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिल धार्मिक यांनी दिली.
त्यांनी सर्व शेतकरी, शेतमजूर आणि निराधार नागरिकांना दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नागपूर येथे मोठ्या संख्येने उ
पस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




