गडचिरोली: जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवा सेनेच्या अध्यक्ष पवन गेडाम यांनी जुनी गाडी घेऊन देतो अशी भूलथापा देऊन फोन पे द्वारे 25 हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याचे आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ता ॲडव्होकेट मिनार खोब्रागडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
युवा सेनेचे अध्यक्ष पवन गेडाम यांनी मागील आठ महिन्यांपूर्वी जुनी गाडी घेऊन देतो अशी बतावणी करून गाडीची अगोदर बुकिंग करावी लागणार असल्याचे सांगून अनामत रक्कम म्हणून 25 हजार रुपये फोन पे द्वारे घेतले.पैसे घेतल्यानंतर गाडी लवकरच मिळेल या आशेने खोब्रागडे यांनी जवळपास एक महिना वाट पाहिली त्या नंतर पुन्हा पवन गेडाम यांना गाडी बद्दल विचारले असता गेडाम यांनी बुकिंग व्हायला अजून वेळ लागणार असल्याचे सांगितले त्यावेळेस पुन्हा एक दीड महिना वाट बघितल्या नंतर सुद्धा पवन गेडाम यांनी गाडी न आणून दिल्यामुळे खोब्रागडे यांनी वारंवार मोबाईल वर संपर्क करून विचारले असता त्यांनी अनेक वेळा लवकरच पैसे परत देतो असे खोटे सांगून उलट आपल्याच पक्षाचे प्रवक्ता ॲडव्होकेट मिनार खोब्रागडे यांना तू माझ्या पक्षाचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांना मला पैसे दिल्याची माहिती का दिली आता माझी बदनामी झाल्यामुळे मी तुला पैसे देणार नाही व तुला जे करायचे ते करून घे अशी धमकीच दिली असल्याची माहिती खोब्रागडे यांनी सांगितली आहे.
अखेर पवन गेडाम यांनी माझे पैसे परत देण्यास नकार दिल्याने मी 25 हजाराची आर्थिक फसवणूक झाली असल्याची लिखित तक्रार पोलिस ठाण्यात केली असून त्या तक्रारीवर पोलिसांनी चालढकल करीत सदर तक्रार ही दिवाणी स्वरूपाची असून त्यानुसार आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे दोन पत्र पोलिस उप निरीक्षक बंडू मार्बोनवार व चौकशी अंमलदार प्रशांत हेडाऊ यांनी 3 एप्रिल 2025 रोजी सूचना पत्र दिले. अशा प्रकारे आर्थिक फसवणूक झाली असताना पोलिसांच्या वतीने तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याची लिखित सूचना दिल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर खोब्रागडे यांनी शंका व्यक्त केली आहे.
माझ्या सोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीची माहिती मी जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांना सुद्धा सांगितली पण त्यांच्या वतीने सुद्धा मला कुठलीही मदत किंवा पवन गेडाम यांना पैसे परत करून टाका अशी समज सुद्धा देण्यात आली नसल्याची माहिती खोब्रागडे यांनी सांगितली.
पवन गेडाम हे मोठ्या लक्झरी गाडी आणि लाखोंचे मोबाईल सुद्धा वापरत असून त्यांचे आर्थिक स्रोत सुद्धा तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खोब्रागडे यांनी केली आहे.
आमच्या पक्षातील युवा सेनेचे अध्यक्ष पवन गेडाम यांनी आपल्याच पक्षाच्या प्रवक्त्याची फसवणूक केली असल्याची माहिती मला आज मिळाली होती.त्यानुसार मी लगेच संपूर्ण माहिती माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना केलविलेले असून त्यांच्या वतीने मिळालेल्या आदेशानुसार मी योग्य ती कारवाई नक्कीच करणार आहे.
वासुदेव शेडमाके.
जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट