उद्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे! जयंती समारोह असो की, महापरिनिर्वाण दिवस असो लोक मोठ्या प्रमाणात एकत्र जमून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. वक्ते पूर्ण तयारीनिशी मोठमोठी भाषणं करतात! बाबासाहेबांनी असं केलं, तसं केलं सांगण्यात त्यांना स्वारस्य असतं. गायक कुठे आपला कार्यक्रम लागतो याची चिंता करतो. पुस्तक विक्रेते पुस्तकांचे मोठमोठे स्टॉल लावून बसतात. काहीजण या निमित्ताने इतरही गोष्टींचा प्रचार नि प्रसार करतात. चैत्य भूमी आणि दिक्षा भुमीवर प्रचंड जनसमूह जमा होतो! लोक नुसतेच जमा होतात की, काही प्रेरणा पण घेऊन जातात हे पाहणं अगत्याचं आहे!
बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्याचं काम क्वचित कुठे होतांना दिसते. बाबासाहेबांना त्यांच्या नावाचा उदोउदो नको होता. त्यांचे मोठमोठे पुतळे उभारले जावेत यासाठी त्यांनी कार्य केलं नव्हतं! माझा समाज जागरूक नि उन्नत झाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. लोक आर्थिक दृष्टीने बऱ्याचअंशी उन्नत झाले पण वैचारिक उन्नती फारशी झाली नाही. बाबासाहेबांच्या नावावर लोक एकत्र येत असले तरी आपसात एकोपा…. भाईचारा…. आपुलकी…. प्रेम कुठेच दिसत नाही. आम्ही बुध्दाला मानतो….. शुभ्र वस्त्र धारण करून विहारात मंदिरात जातो पण त्याच्या धम्माचं पालन नीट करीत नाही. प्रज्ञा शिल करुणा यापैकी एकही गोष्ट आमच्या आचरणात नाही! शेजारी मेला काय…. वाचला काय याच्याशी आम्हाला काही एक घेणंदेणं नसतं. खूप सारे विकार आमच्यात भरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर नि महाकारुणिक गौतम बुद्धांचा अनुयायी
इतरांपेक्षा थोडा हटके दिसायला पाहिजे पण तसं झालं नाही! आम्ही नावाचे बौद्ध आहोत की काय असं खुपदा वाटतं! भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न आम्ही पाहतो पण हे कधी होईल जेव्हा आमच्यापासून इतरांना प्रेरणा मिळेल! अनेक माणसं या ना त्या कारणाने बौद्ध धम्म स्विकारतात पण जुन्या रूढी सोडत नाही! ते शिवालाही मानतात आणि बुद्धासमोरही हात जोडतात. अशी माणसं धम्मात येऊन उपयोग काय? भरमसाठ संख्या वाढण्यापेक्षा गुणात्मक बद्दल झाला पाहिजे मी या मताचा आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बस एवढंच एक सांगणं! हे इतरांना सांगत असतांना मलाही माझं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे यांचं भान मला आहे. जयभीम! नमोबुध्दाय!
श्रीनिवास गेडाम, गडचिरोली यांच्या लेखणीतून…
5/12/22