Home ब्रेकिंग न्यूज चालत्या कंटेनरला कारची जोरदार धडक; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, वाहतूक नियमांच्या जनजागृतीची...

चालत्या कंटेनरला कारची जोरदार धडक; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, वाहतूक नियमांच्या जनजागृतीची मागणी…

0
39

 

गडचिरोली : शहरातील वाढती जड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात पोस्ट ऑफिस समोर चालत्या मालवाहू कंटेनरला एका कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे एक मोठा अनर्थ थोडक्यात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी मार्गावरून गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकाच्या दिशेने एक मोठा मालवाहू कंटेनर येत होता. त्याचवेळी कॅम्प एरिया परिसरातील आतील रस्त्यावरून एक होंडा अमेझ कार मुख्य मार्गावर येत होती. मात्र मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या कंटेनरकडे दुर्लक्ष करून कार चालकाने अचानक वाहन मुख्य मार्गावर आणल्याने चालत्या कंटेनरच्या उजव्या बाजूला कारची जोरदार धडक बसली.

धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कंटेनर चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावरील नियंत्रण कायम ठेवले, त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कार चालकाला वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगून वाहतूक सुरळीत केली. तसेच मुख्य मार्गावर प्रवेश करताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि समोरून येणाऱ्या वाहनांची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणणे आवश्यक असल्याची समज संबंधित चालकाला देण्यात आली.

गडचिरोली शहरातील चारही प्रमुख महामार्गांवर सध्या जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक बेदरकारपणे व वेगाने वाहन चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. अनेक घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.

वाहतुकीचे नियम पाळणे, मुख्य रस्त्यावर वाहन आणताना आवश्यक ती खबरदारी घेणे आणि संयमाने वाहन चालविणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे व्यापक जनजागृती मोहीम राबवून वाहन चालकांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here