Home ब्रेकिंग न्यूज तिकीट मशीन बंद पडल्याने एक तास रस्त्यातच ठप्प राहिली एसटी बस; प्रवाशांचा...

तिकीट मशीन बंद पडल्याने एक तास रस्त्यातच ठप्प राहिली एसटी बस; प्रवाशांचा संताप, आजाद समाज पार्टीचा आंदोलनाचा इशारा…

0
181

 

गडचिरोली, दि. 07 मे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. गडचिरोलीहून खांबाडाकडे जाणारी एसटी बस तिकीट काढण्याचे मशीन अचानक बंद पडल्याच्या कारणावरून धानोरा तालुक्यातील ढवळी गावाजवळ तब्बल एक तास रस्त्यातच उभी ठेवण्यात आली. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून एसटी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 07 मे रोजी सकाळी साधारण 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास गडचिरोलीवरून खांबाडा येथे जाणारी एसटी बस ढवळी गावाजवळ अचानक थांबवण्यात आली. बसमधील तिकीट काढण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन अचानक बंद पडल्याचे कारण देत बस पुढे हलवण्यात आली नाही. परिणामी कर्मचारी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांना दीर्घकाळ रस्त्यात थांबून राहावे लागले.

प्रवाशांनी चालक व वाहकांकडे बस का थांबवून ठेवली याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्यांनी अरेरावीची व उद्धट भाषा वापरल्याचा गंभीर आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे. “बस इथून सोडणार नाही, जायचं असेल तर जा, नाहीतर जे बनतं ते करा,” अशा प्रकारची भाषा वापरल्याने प्रवाशांचा संताप आणखी वाढला.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, तिकीट मशीन खराब होणे ही नवीन बाब नसून अशा परिस्थितीत एसटी महामंडळाकडे मॅन्युअल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था असणे अपेक्षित होते. मात्र मशीन बंद पडल्याचे कारण देत संपूर्ण बसच रस्त्यात उभी करून प्रवाशांना वेठीस धरणे हा पूर्णपणे बेजबाबदार आणि अन्यायकारक प्रकार असल्याची टीका होत आहे.

या घटनेमुळे वेळेवर कार्यालयात पोहोचणारे कर्मचारी, उपचारासाठी प्रवास करणारे रुग्ण तसेच इतर नागरिकांना मोठा फटका बसला. काही प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपली महत्त्वाची कामे खोळंबल्याची नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर आजाद समाज पार्टीने तीव्र संताप व्यक्त करत एसटी महामंडळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली आहे. प्रवाशांकडून तक्रार प्राप्त होताच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी तात्काळ संबंधित आगार प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संबंधित बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भविष्यात अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या घटना पुन्हा घडल्यास आजाद समाज पार्टीच्या वतीने संबंधित एसटी डेपोसमोर तीव्र “हल्लाबोल आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे. सामान्य प्रवाशांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here