Home ब्रेकिंग न्यूज भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक! गावाकडे परतणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू; नात्यातील तरुण गंभीर..

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक! गावाकडे परतणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू; नात्यातील तरुण गंभीर..

0
62

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारा नात्यातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुंगाटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतांची ओळख कुम्मा महारु पुंगाटी (५६) व मिडको कुम्मा पुंगाटी (४८), रा. महाकापाडी, ता. भामरागड अशी झाली आहे. तर गंभीर जखमी झालेला आशिष चंदू महाका (१७), rा. परायनार, ता. भामरागड याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुम्मा आणि मिडको पुंगाटी हे दाम्पत्य काही कामानिमित्त आलापल्ली येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने महाकापाडी गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, तलवाडा येथे बसची प्रतीक्षा करत उभा असलेला त्यांचा नात्यातील तरुण आशिष महाका दिसला. गावाकडेच जायचे असल्याने दाम्पत्याने त्याला दुचाकीवर लिफ्ट दिली आणि तिघेही मार्गस्थ झाले.
मात्र, तलवाडा गावापासून काही अंतरावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कुम्मा पुंगाटी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मिडको पुंगाटी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला तडफडत होत्या. आशिषलाही गंभीर दुखापत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी टायगर ग्रुपला संपर्क केला. त्यानंतर साई तुलसीगारी यांनी दोन रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, याचदरम्यान अचानक अवकाळी पावसाने जोर धरला. रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क खंडित झाल्यामुळे मदतकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला.
टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या मिडको पुंगाटी यांनी रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रात्री उशिरा रस्ता मोकळा करून आशिषला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, आशिष नुकताच दहावी उत्तीर्ण होऊन पुण्यात अकरावीचे शिक्षण घेत होता. तो ६ मे रोजी आलापल्ली येथे आला होता. तलवाडा येथे बसची प्रतीक्षा करत असताना नातेवाईक असलेल्या पुंगाटी दाम्पत्याने त्याला सोबत घेतले. मात्र, हीच लिफ्ट त्यांच्या आयुष्यातील शेवटची सफर ठरली.
दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर मालकाने संबंधित ट्रॅक्टर आपलाच असल्याची कबुली दिली आहे. या दुःखद घटनेचा तपास अहेरी पोलीस करीत आहेत।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here