Home ब्रेकिंग न्यूज विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरावर झाड कोसळले; महिला जखमी, मोठी जीवितहानी टळली…

विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरावर झाड कोसळले; महिला जखमी, मोठी जीवितहानी टळली…

0
144

 

गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृहात काल रात्री अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून पडून स्वयंपाकघरावर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत स्वयंपाकघरात काम करणारी एक महिला किरकोळ जखमी झाली असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. काल अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वारे सुटले. या वाऱ्याच्या तडाख्यामुळे विश्रामगृह परिसरातील एक जुने झाड मुळासकट उखडून पडले आणि थेट स्वयंपाकघरावर कोसळले. त्यावेळी स्वयंपाकघरात एक महिला स्वयंपाकाचे काम करत होती, तर इतर कर्मचारी बाहेर उभे असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता अविनाश मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली.

प्राथमिक माहितीनुसार, अचानक बदललेल्या हवामानामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडली आहे. सध्या प्रशासनाकडून परिसरातील धोकादायक झाडांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here