
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदावरून महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या जागी ॲडव्होकेट विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात आज जिल्ह्यातील बाराही तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी तसेच बूथ लेव्हलवरील कार्यकर्त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्ष नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, मागील महिन्यात झालेल्या “संघटन सृजन अभियान” कार्यक्रमादरम्यान ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांसमोर जवळपास 98 टक्के कार्यकर्त्यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनाच पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राजस्थानमधून आलेल्या काँग्रेस निरीक्षकाने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सर्वांच्या पसंतीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पक्ष हायकमांडने वेगळाच निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.
“महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उभा केला काँग्रेसचा जनाधार”
पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही जिल्हाध्यक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात जनसंपर्क, आंदोलने आणि संघटनात्मक काम केले नव्हते. महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकरी, गावकरी, भूमिहीन नागरिक तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत काँग्रेस पक्षाचा मोठा जनाधार निर्माण केला.
विशेषतः जिल्ह्यातील मायनिंग कंपन्यांविरोधातील आंदोलने, भूमी अधिग्रहणाच्या विरोधातील लढे, विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनांमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा प्रशासन आणि सरकारची मोठी फजिती झाल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.
“कंपनी आणि वरिष्ठांच्या दबावातूनच निर्णय?”
पत्रकार परिषदेत काही कार्यकर्त्यांनी गंभीर शंका व्यक्त करत म्हटले की, महेंद्र ब्राह्मणवाडे हे सातत्याने शेतकरी आणि गावकऱ्यांच्या बाजूने उभे राहत होते. मायनिंग कंपन्या, भूमी अधिग्रहण आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यामुळेच आता कुठेतरी कंपन्या, प्रशासन आणि काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचे हितसंबंध एकत्र आल्यानेच हा निर्णय घेण्यात आला काय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला की, गडचिरोलीमध्ये आदिवासी विरुद्ध गैर आदिवासी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघ आदिवासी आरक्षणाचे असताना, संघटनात्मक संतुलन राखण्यासाठी यापूर्वी गैर आदिवासी चेहरा म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आणि ओबीसी समाजामध्ये समन्वयाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आता आदिवासी चेहरा म्हणून ॲडव्होकेट विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करून कुठेतरी सामाजिक विभागणीचे राजकारण केले जात आहे का, असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
“महेंद्र ब्राह्मणवाडे हटल्याशिवाय कंपनी-प्रशासनाची मनमानी शक्य नव्हती का?”
पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, शेतकरी आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यामुळे अनेक कंपन्या आणि प्रशासन अडचणीत येत होते. त्यामुळेच काँग्रेस कमिटीने हा बदल घडवून आणला काय, अशी शंका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
“26 मे रोजी मोठा निर्णय”
काँग्रेस कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, जर महेंद्र ब्राह्मणवाडे यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदी संधी देण्यात आली नाही, तर 26 मे रोजी मोठा निर्णय जाहीर करण्यात येईल. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी काँग्रेस पक्ष नेतृत्वाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गडचिरोली काँग्रेसमधील या अंतर्गत नाराजीमुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।


