गडचिरोली : ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी राज्यभर “संघटन सृजन अभियान” राबविण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यातही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला होता.
या अभियानादरम्यान राजस्थानचे आमदार व काँग्रेस निरीक्षक मनीष यादव यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करत जिल्हाध्यक्ष पदासाठी योग्य नेतृत्व कोण असावे याची चाचपणी केली होती. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, “ज्यांच्या पाठीशी सर्वाधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे राहतील, त्याच व्यक्तीची सर्वसंमतीने जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल.”
या पार्श्वभूमीवर विद्यमान जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनाच पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, २२ मे रोजी पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या आदेशात त्यांना पदावरून दूर करून अॅड. विश्वजीत कोवासे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे काँग्रेसमधील गैर-आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
निर्णयानंतर अनेक नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. “महेंद्र ब्राह्मणवाडे यांनाच पुन्हा जिल्हाध्यक्ष करावे, अन्यथा कार्यकर्ते मोठा निर्णय घेतील,” असा इशाराही देण्यात आला होता. चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आल्यानंतरही पक्षाने निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, २६ मे रोजी गडचिरोली येथे “शेतकरी मेळावा” या नावाखाली आयोजित कार्यक्रमात नव्या जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळाच पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कार्यक्रमाला अधिकृतपणे शेतकरी मेळावा असे नाव देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात तो पदग्रहण समारंभ असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात होते. विमानतळ भूमी अधिग्रहण आणि सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचा मोठा सहभाग या कार्यक्रमात दिसून न आल्याने “हा खरोखर शेतकरी मेळावा होता का?” असा सवालही उपस्थित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही काँग्रेसमधील गटबाजी उघड झाल्याची चर्चा होती. मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील यांचे नाव पत्रिकेत नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. धानोरा तालुक्यात त्यांचा मोठा प्रभाव असतानाही त्यांना कार्यक्रमात स्थान न दिल्याने त्यांच्या अनेक समर्थकांनी कार्यक्रमापासून अंतर ठेवल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या वाढती गटबाजी, ओबीसी-आदिवासी समतोल आणि नेतृत्वातील अंतर्गत संघर्ष ही मोठी आव्हाने समोर येत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा रंगली की, जिल्ह्यातील एका प्रभावशाली ओबीसी नेत्याच्या राजकीय समीकरणांमुळेच महेंद्र ब्राह्मणवाडे यांना पदावरून दूर करण्यात आले. कंपनीविरोधी आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि जनतेच्या अडचणींवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी गेल्या पाच वर्षांत काँग्रेसला जिल्ह्यात सक्रिय ठेवले, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे यांच्यासमोर आता संघटन एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सर्व तालुक्यांमध्ये दौरे करून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नाराज गटांशी संवाद साधत पक्षातील मतभेद कमी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यासच पक्षातील नाराजी कमी होऊ शकते, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
याचदरम्यान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांची नवनियुक्त अध्यक्षांनी भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेसमधून निलंबित असलेल्या माजी आमदारांकडे नव्या अध्यक्षांनी भेट देण्यामागील कारणांवरूनही विविध चर्चांना उधाण आले आहे.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मात्र संयमी भूमिका घेत पक्षाविरोधात कोणतीही उघड प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कायम राहणार असून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच काम करत राहीन,” अशी प्रतिक्रिया दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, “काँग्रेस पक्षात बदल होत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष न्याय देण्याचा प्रयत्न करतो. जिल्हाध्यक्ष बदलण्यामागे माझा कोणताही हात नाही. हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “महेंद्र ब्राह्मणवाडे असोत किंवा नवे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहील. पक्षात कुठलेही मतभेद निर्माण होऊ देणार नाही.”
आता जिल्हाध्यक्षपदाच्या या बदलानंतर गडचिरोली काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी कितपत शांत होते, नव्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा कितपत पाठिंबा मिळतो आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




