Home ब्रेकिंग न्यूज बाथरूममधील ‘हिटर’ ठरला जीवघेणा; गडचिरोलीतील तरुण उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू, शहरात शोककळा…

बाथरूममधील ‘हिटर’ ठरला जीवघेणा; गडचिरोलीतील तरुण उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू, शहरात शोककळा…

0
559

 

गडचिरोली, प्रतिनिधी :

शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, बाथरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हिटरमुळे विद्युत शॉक बसून एका तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला आहे. जयंत मनोहर भांडेकर (वय २४, रा. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव असून, ते शहरातील प्रसिद्ध ‘जयंत आटा चक्की’चे संचालक म्हणून ओळखले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भांडेकर यांनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे दिवसभराचा व्यवसाय आटोपून रात्री घरी परतले. त्यानंतर ते आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. यावेळी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेल्या हिटरमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि ते बाथरूममध्येच कोसळले.

बराच वेळ उलटूनही जयंत बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता जयंत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

जयंत भांडेकर हे साध्या, हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते. कष्टाळू वृत्ती आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.

आज शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, एका उमद्या आणि होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्युत उपकरणांचा वापर करताना घ्या विशेष काळजी

या घटनेने घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, गिझर, हिटर यांसारखी उपकरणे वापरताना विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, विशेषतः बाथरूमसारख्या ओलसर ठिकाणी.

आंघोळीपूर्वी गिझर किंवा हिटर बंद करणे, योग्य ‘अर्थिंग’ची नियमित तपासणी करणे तसेच कोणतीही तांत्रिक बिघाड आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. क्षणिक निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here