शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भोजनदान करून,महिला रुग्ण व नातेवाईकांना भोजन थाळी वाटप; सेवाभावातून दिला समाजाला सकारात्मक संदेश…
गडचिरोली : शिवसेना महिला आघाडी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान (भोजन थाळी) करून समाजसेवेचा आदर्श घालून देण्यात आला.
हा कार्यक्रम शिवसेनेच्या माजी महिला जिल्हा प्रमुख तसेच माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील गरजू महिला व त्यांच्या कुटुंबीयांना भोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थित नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला राजाभाऊ कावळे, नवनाथ उके, राहुल सोरते, सुशीला जयसिंगपूर, सीमा पराशर, आरती खोब्रागडे, गीता मेश्राम, ज्योत्स्ना राजूरकर, अश्विनी भांडेकर, वीणा निंबेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीतील एकनाथ शिंदे गटाशी संबंधित शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत सेवा आणि समाजहिताला प्राधान्य दिल्याचे यावेळी दिसून आले. या उपक्रमातून “वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्याची संधी” हा संदेश देण्यात आला.
सहपालकमंत्री आशीष जयस्वाल हे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांबाबत सतत सक्रिय राहून जनतेच्या अडचणी समजून घेण्यास प्राधान्य देतात. ते वेळोवेळी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला मार्गदर्शन करतात.
त्यांच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्तेही जनतेच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष देत असून अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. त्यामुळेच जिल्ह्यात त्यांची प्रतिमा एक जनहितैषी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अधिक बळकट होत आहे.
या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करत, भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.




