Home ब्रेकिंग न्यूज सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; ओपीडी वेळेआधीच बंद, डॉक्टरांच्या निष्काळजीपणावरून संताप…

सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; ओपीडी वेळेआधीच बंद, डॉक्टरांच्या निष्काळजीपणावरून संताप…

0
582

 

गडचिरोली :

गडचिरोली जिल्ह्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेले वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यासाठी मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे मानले जात असताना, आता त्याच आरोग्य व्यवस्थेत काही डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आजची परिस्थिती पाहता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात परिवर्तित झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखाली काम करणारे अनेक आरोग्य अधिकारी आता वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या अखत्यारित आले आहेत. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बहुतांश अधिकार आता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाळे यांच्याकडे केंद्रीत झाले आहेत. यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई होण्याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की काही डॉक्टर कथितपणे “मॅनेजमेंट” करून आपली जबाबदारी टाळत आहेत. सामान्य रुग्णालयातील ओपीडीची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत असताना देखील अनेक डॉक्टरांनी आज सुमारे १२ वाजताच्या सुमारासच रुग्णालयातून निघून गेल्याचे समोर आले. त्यामुळे उपचारासाठी दूरदूरच्या भागातून आलेल्या रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११.३० ते १२ वाजताच्या दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी गेलेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके रुग्णालयात उपस्थित होत्या. मात्र, त्यानंतरही काही डॉक्टरांनी बिनधास्तपणे दुपारी १२ वाजताच ओपीडी बंद करून रुग्णालय सोडल्याचे सांगितले जात आहे.

सव्वा बारा वाजताच्या सुमारास या प्रकाराची माहिती डॉ. छाया उईके यांना मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष भेटून देण्यात आली. तरीही त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत कोणताही डॉक्टर ओपीडीमध्ये परत आला नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

डॉक्टरांना परमेश्वरानंतर दुसरा देव मानले जाते. मात्र, जर त्यांच्याकडूनच रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची, असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. संबंधित कामचुकार डॉक्टरांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना काल शहरातील महिला व बाल रुग्णालयात घडली. उपचारादरम्यान ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डॉक्टर प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जर अशा प्रकारे डॉक्टरांकडून निष्काळजीपणा होत असेल, तर या प्रकरणात जबाबदारांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here