Home आरोग्य वांगेपली येथे सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद VHSND कार्यक्रमांतर्गत जनजागृती...

वांगेपली येथे सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद VHSND कार्यक्रमांतर्गत जनजागृती व तपासणी मोहीम यशस्वी…

0
109

 

वांगेपली | दि. १६ जानेवारी २०२६ :

वांगेपली गावात आज VHSND (Village Health Sanitation and Nutrition Day) कार्यक्रमाच्या निमित्ताने सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर उपक्रम सरपंच दिलीप मडावी व डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

सिकलसेल अ‍ॅनिमिया या अनुवंशिक आजाराबाबत जनजागृती करणे, वेळेवर तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना सिकलसेल आजाराची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, तपासणीचे महत्त्व व उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या रॅलीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच दिलीप मडावी यांनी स्थानिक भाषेत नागरिकांना सिकलसेल आजाराबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. आरोग्य तपासणीला प्राधान्य देऊन वेळेवर निदान केल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात, असे त्यांनी नमूद केले.

तसेच डॉ. लुबना हकीम यांनी सिकलसेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक आजार असून योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान निश्चितच सुधारू शकते, अशी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

या अभियानांतर्गत MMU टीम, CHO, आरोग्य सहाय्यक, ANM, आशा कार्यकर्त्या व गट प्रवर्तक यांच्या संयुक्त सहकार्याने सिकलसेल पात्र लाभार्थ्यांची सोल्यूबिलिटी तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोन रुग्ण संशयित आढळून आले असून त्यांना पुढील सखोल तपासणी व उपचारासाठी SDH (उपजिल्हा रुग्णालय) येथे पाठविण्यात आले आहे.

सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियानामुळे वांगेपली परिसरात आरोग्याविषयी जनजागृती वाढीस लागली असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here