Home राजकीय मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जनतेचे आरोग्य धोक्यात…७ जानेवारी रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन…

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जनतेचे आरोग्य धोक्यात…७ जानेवारी रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन…

0
628

 

अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातेच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर…

गडचिरोली :

गडचिरोली जिल्हा हा दुर्गम व मागास म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवून सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली असली, तरी प्रत्यक्षात आजही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब, कष्टकरी व आदिवासी जनतेला सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात अपुरे रस्ते, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव व निकृष्ट आरोग्य सुविधांमुळे सातत्याने जीवघेण्या घटना घडत आहेत. नुकताच उपचाराअभावी एका गरोदर मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या गंभीर घटनेनंतरही राज्य शासन व प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तातडीने सक्षम करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे पक्के रस्ते व सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसने मांडल्या आहेत.

या मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here