Home आरोग्य गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची दयनीय अवस्था उघडकीस!

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची दयनीय अवस्था उघडकीस!

0
633

 

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात रुग्णालयाची व्यवस्थाच कोलमडली; सांडपाणी, दुर्गंधी, फुटलेल्या पाईपलाईन आणि बंद लिफ्टमुळे रुग्ण त्रस्त!

 

गडचिरोली ::

गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दयनीय परिस्थितीने आज पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. जिल्हाभरातून आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या हजारो रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय आता स्वतःच आजारी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

 सांडपाण्याने व्यापला रुग्णालय परिसर…

 

रुग्णालयातील सांडपाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने दवाखान्याच्या परिसरात घाणेरडे पाणी साचलेले आढळले. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, हिवताप, टायफाईड आणि मलेरियासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. घाणीच्या या साठ्यामुळे नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसते.

 

आरोग्य प्रशासनाचे निष्क्रिय कामकाज!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकत्व असलेला गडचिरोली जिल्हा असतानाही आरोग्य विभागाची लाजिरवाणी कार्यप्रणाली उघड झाली आहे. रुग्णालयातील अनेक पाईपलाईन फुटल्या असून, शौचालयाचे आणि पिण्याच्या पाण्याचे पाईप एकत्रित झाल्याने संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण प्रशासन ढिसाळ झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही त्यांनी समस्या दूर करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 

 लिफ्ट, रॅम्प, आणि दुरुस्ती थांबलेली…

 

गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी आवश्यक असलेली लिफ्ट महिन्यांपासून बंद, रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. तसेच रुग्णवाहिका रॅम्प तुटलेले, रस्त्यावर खड्डे, आणि रुग्णालयाच्या इमारतीतील जुनी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे.

 

 

पत्र दिल्याचा दावा, पुरावा नाही!

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक नगरपालिकेला पत्र पाठविले आहे. मात्र जेव्हा पत्रकारांनी त्या पत्राचा पुरावा मागितला, तेव्हा त्यांनी “तो दाखवू शकत नाही” असे सांगून विषय चुकवला.

 

जर खरोखरच पत्र पाठविले असेल आणि तरीही काम झाले नाही, तर स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 “जबाबदारी झेपत नसेल तर बदली करा” – नागरिकांचा संताप…

रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत.त्यांनी सांगितले, “डॉ. माधुरी किलनाके यांना जबाबदारी झेपत नसेल, तर त्यांची बदली करावी. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हावी.

 

 “जुनी पाईपलाईन ताबडतोब बदला, सांडपाण्याचा साठा रोखा आणि रुग्णालयाचा कारभार जबाबदारीने चालविण्यास सक्षम अधिकारी द्या. रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, हीच आमची अपेक्षा!” – गडचिरोली नागरिक…

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाची ही स्थिती आरोग्य विभागासाठीच नव्हे तर शासनासाठीही लाजिरवाणी ठरली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय परिस्थिती सुधारेल, अशी शक्यता कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here