Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत पुन्हा गोतस्करीचा थरार; गौरक्षकांवर लोखंडी रॉड आणि बंदुकीने हल्ला, तीन जखमी!

गडचिरोलीत पुन्हा गोतस्करीचा थरार; गौरक्षकांवर लोखंडी रॉड आणि बंदुकीने हल्ला, तीन जखमी!

0
3138

 

 

गडचिरोली :

गडचिरोली शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही काळापासून गोतस्करीच्या घटना वारंवार समोर येत असून, पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने नागरिक आणि हिंदू समाजात तीव्र नाराजी पसरलेली आहे.

गौरक्षकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून कारवाई झाली तरी आरोपींवर किरकोळ कलमांखाली गुन्हे दाखल केले जातात, ज्यामुळे त्यांना ताबडतोब जामिनावर सुटका मिळते.

शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेने या प्रश्नाला पुन्हा उधाण आले असून, गडचिरोली शहरात गोतस्करांनी गौरक्षकांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

गौरक्षकांनी पकडली गोतस्करीची गाडी, आरोपी फरार…

काल सकाळी एका पिकअप चारचाकी वाहनामध्ये तीन बैलांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गौरक्षकांनी त्या वाहनाला अडवले.

यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले, मात्र त्याचवेळी वाहनातील चार आरोपींपैकी वसीम कुरेशी हा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

उर्वरित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यानंतर न्यायालयात सादर केल्यावर तिन्ही आरोपींना ताबडतोब जामिनावर सोडण्यात आल्याने गौरक्षकांमध्ये संताप उसळला.

 

रात्री पुन्हा गोतस्करीचा प्रयत्न — हल्ला करून गौरक्षक जखमी…

 

रात्री पुन्हा काही गौरक्षकांना गडचिरोली शहरातून गोतस्करी करणारे वाहन जात असल्याचे दिसले.त्यांनी त्या वाहनांचा पाठलाग करून चंद्रपूर रोडवरील कनेरी नाका परिसरात अडविण्याचा प्रयत्न केला.

या वेळी गौरक्षक वॅगनआर कारमधून पाठलाग करत होते, तर गोतस्करांचा पिकअप वाहनात जनावरे भरलेली होती.

वाहन थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर पिकअपमधील आरोपींनी थेट गौरक्षकांच्या कारला धडक देत पसार होण्याचा प्रयत्न केला.लगेचच पांढऱ्या रंगाची क्रेटा कार तेथे आली, आणि त्या वाहनातील चार ते पाच जणांनी गौरक्षकांवर लोखंडी रॉड व बंदुकीच्या सहाय्याने हल्ला केला.

या हल्ल्यात नितेश सुभाष धाईत (३१, पंचवटी नगर), हरीश गोविंदा माकडे (३१, नवेगाव) आणि अंकुश पवार (२५, गडचिरोली) हे तिघे गौरक्षक गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

 

गौरक्षकांचा आरोप — “पोलीस प्रशासन गोतस्करांवर मेहरबान!”

गौरक्षकांच्या म्हणण्यानुसार, गडचिरोलीत दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळेस गोतस्करी राजरोसपणे सुरू असून, पोलीस प्रशासन मात्र कारवाईस टाळाटाळ करत आहे. “गोतस्करी करणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याचा संशय आम्ही पोलिसांवर व्यक्त करतो.

जप्त केलेल्या मोबाईलमध्ये राजकीय नेते व काही अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे संभाषण आढळले आहे,” — असा आरोप गौरक्षकांनी केला आहे.

 

राजकीय व धार्मिक संघटनांची संतप्त प्रतिक्रिया…

या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरद पवार गट) यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच अशी निर्घृण घटना घडणे लाजिरवाणे आहे.

गोतस्करांवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा बसवावा,” — अशी मागणी सर्व संघटनांनी केली आहे.

 

हिंदू समाजामध्ये संतापाचे वातावरण असून, “गाय-बैलांच्या रक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने काम करत असताना, आमच्यावरच बंदुकी आणि शस्त्राने हल्ले होत आहेत,” — असा आक्रोश गौरक्षकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गोतस्करांकडून जप्त केलेल्या मोबाईलमधील संभाषणाची तपासणी करून त्यांचे कोणत्या राजकीय व्यक्ती किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संबंध आहेत का, याची चौकशी करण्यात यावी.

रात्रपाळीत तैनात असलेल्या पोलिसांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

गडचिरोलीत पुन्हा उघडकीस आलेल्या या गोतस्करीच्या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचेही दर्शन घडवले आहे.

गौरक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी,अन्यथा जनतेचा रोष रस्त्यावर उतरेल, असा इशारा हिंदू संघटनांकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here