प्रलंबित रस्ते कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांना कडक सूचना…

0
78

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड मान्य नाही — जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा…

 

 

गडचिरोली, दि. ९ :

जिल्ह्यात मंजूर झालेली अनेक रस्ते बांधकामाची कामे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. काही ठिकाणी तर वर्षभर उलटलं, तरी कामालाच सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित विभागांना स्पष्ट इशारा दिला — “कामाची गुणवत्ता राखून ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.

 

रस्ते कामांचा सखोल आढावा…

 

जिल्हाधिकारी पंडा यांनी काल सायंकाळी घेतलेल्या विशेष बैठकीत जिल्ह्यातील विविध बांधकाम प्रकल्पांचा आढावा घेतला.

बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी रणजित यादव, तसेच कुशल जैन (अहेरी), अनुष्का शर्मा (आरमोरी), अमर राऊत (एटापल्ली), अरुण एम. (चामोर्शी) यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

 

वन विभागावर दोष टाकणे योग्य नाही…

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने २९५ किमी व राष्ट्रीय महामार्ग विभागाने ५४६ किमी रस्ते काम सुरू असल्याची माहिती दिली.

मात्र अनेक ठिकाणी विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट विचारणा केली — “मंजुरी मिळूनही कामात विलंब का?”

 

राष्ट्रीय महामार्ग विभागाने “वन मंजुरी न मिळाल्यामुळे उशीर” असे कारण दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले — “वन विभागाकडून कोणतीही अडचण नसल्याचे कळविण्यात आले आहे; त्यामुळे अनावश्यक कारणे न देता तातडीने समन्वय साधा.”

 

‘ट्रिफॉलिंग’च्या कारणास्तव कामे अडवू नका…

 

काही ठिकाणी ट्रिफॉलिंगच्या नावाखाली कामे थांबवण्यात आली आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“अपूर्ण कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिथे कोणतीही अडचण नाही, तिथे तातडीने काम सुरू करा,” अशा कडक शब्दांत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला निर्देश दिले.

 

कंत्राटदारांवर शास्तीची कारवाई करा…

 

वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात शास्ती लावली आहे का, नसल्यास का नाही — याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, “शासकीय नियमानुसार मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई बंधनकारक आहे. पुढे मुदतवाढ देताना कठोर भूमिका घेतली जाईल.

 

गुणवत्तेबाबत तडजोड नाही…

 

जिल्ह्यातील काही कामांच्या गुणवत्तेबाबत मिळालेल्या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. दोषी आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

 

कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्तीला प्राधान्य…

 

अनेक महसूल मंडळांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अत्यंत नादुरुस्त अवस्थेत आहेत. काही ठिकाणी नवीन इमारती तयार असूनही किरकोळ कामांमुळे रिकाम्या आहेत.

“ही सर्व निवासस्थाने तातडीने दुरुस्त करून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत,” असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

 

पायाभूत विकासासाठी स्थळ पाहणी…

 

दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच महसूल विश्रामगृह व प्रस्तावित प्रेक्षागृहासाठी विविध स्थळांची पाहणी करून जागा निश्चित करण्याबाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here