गडचिरोली, दि. 14 : शहरातील आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम स्कूलजवळील दर्गा समोर आज दुपारी सुमारे 12.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले.
प्राप्त माहितीनुसार, पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे (वय 40) आणि अंकुश बाबूराव बारसागडे (वय 35), रा. सुभाष वार्ड, गडचिरोली हे दोघे भाऊ आपल्या MH-33-R-7789 क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून गडचिरोलीकडे परत येत होते. दरम्यान, आरमोरीकडे जाणाऱ्या MH-34-BG-8657 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही भाऊ जागीच ठार झाले. अपघाताची बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने बारसागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरुषोत्तम यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहेत, तर अंकुश यांच्या मागे पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
महेश माणिक पुरी (वय 32, रा. चंद्रपूर) असे ट्रकचालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरा अपघात….
चंद्रपूर रोड वरील रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स पुढे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराने निष्काळजी आपली दुचाकी चालवित वृद्ध माणसाला धडक दिल्याने रमेश आडकू चलाख वी 67 वर्ष हा जागीच ठार झालेला होता.धडक देणाऱ्या दुचाकी चालक हा 17 वर्षाचा नाबालिक असून याच्यावर आणि याच्या कुटुंबातील सदस्यांवर 10 च्या वर अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
खड्ड्यांमुळेच झाला अपघात…?
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, हा अपघात रस्त्यावरील खड्डे टाळताना झाला आहे. आरमोरी मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खड्ड्यांनी भरून गेला असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते की खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभाग जबाबदार धरला जाईल. त्यामुळे या अपघाताच्या प्रकरणात जबाबदारी कोणावर येते, हे लक्षवेधक ठरणार आहे.
आरमोरी मार्गावरील रस्ता नागरिकांच्या जिव्हारी…
इंदिरा गांधी चौकापासून आरमोरी मार्गावरील रस्ता अत्यंत जर्जर अवस्थेत असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मोठे पुढारी किंवा मंत्री जिल्ह्यात आल्यावरच या मार्गाची तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र दैनंदिन वापर करणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
एकीकडे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणा करतात; पण जिल्हा मुख्यालयातीलच रस्त्यांची अशी दुर्दशा पाहता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “पालकमंत्री हवाई दौरे करतात, पण प्रत्यक्ष रस्त्यांची अवस्था पाहण्यासाठी कधी येतील?” असा सवाल नागरिक करत आहेत.
