गडचिरोली:दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली येथे शोषित, वंचित व आदिवासी समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देणारे युवा वकील ॲड. बोधी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
पुण्यात कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मातीतल्या सामान्य वंचित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे बोधी रामटेके यांनी गडचिरोलीतील अनेक दुर्गम भागात जाऊन जनजागृती केली. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आणि मूलभूत अधिकारांपासून वंचित असलेल्या गावकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.
रेगडी जवळील वेंगणूर हे गाव डोंगरातून नावेतून प्रवास करून मतदान करण्यासाठी नेहमी चर्चेत राहिले आहे. या भागातील वेंगणूर, सुरगाव, गरंजी, पुल्लीगुडम आदी गावांच्या समस्या बोधीजींनी प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या. आपल्या सहकाऱ्यांसह पाथ फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी आकडेवारी गोळा करून उच्च न्यायालयात पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे न्यायालयाने सहा महिन्यांच्या आत रस्ता व पुल बांधण्याचे आदेश दिले. परिणामी या गावांमध्ये आज रस्ते झाले, पुलिया बांधल्या गेल्या आणि हळूहळू विकासाला चालना मिळाली.
गडचिरोली जिल्ह्यातील रस्ता-पुल बांधकाम, अवैध जंगलतोड, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि इतर अनेक मूलभूत प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार बोधी रामटेके यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या संघर्षामुळे आज जिल्ह्यातील वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याचा मार्ग अधिक दृढ झाला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांच्या हस्ते हॉटेल वैभव येथे ॲड. बोधी रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे आई-वडील प्राचार्य श्याम रामटेके हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश भाऊ मडावी, प्रमोदजी आसूडकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात संविधानाचे शस्त्र हातात घेऊन न्यायासाठी लढणाऱ्या या तरुण वकिलाचा संघर्ष जिल्ह्यासाठी आजही प्रेरणादायी ठरतो आहे.
