आपल्याच कार्यकर्त्याची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती पहायला गेले नाही…?? आमदार साहेब, हे वागणं बरं नव्हं..! गडचिरोलीत नाराजीची हवा…??

0
1291

 

 

गडचिरोली – जनतेच्या मनात निवडून आलेल्या आमदारांकडून काही ठराविक अपेक्षा असतात – साधेपणा, उपलब्धता, लोकांच्या अडचणीत तत्पर मदत, आणि सर्व घटकांचा सन्मान. मात्र, गडचिरोलीतील आमदार साहेबांची कार्यशैली पाहता, या अपेक्षा जणू केवळ पुस्तकातच राहिल्या आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

मागील हफ्त्यात चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना 400 mg ब्रुफेन गोळ्या दिल्याने 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. ही आश्रम शाळा भाजप कार्यकर्त्याची असून, अशा कार्यकर्त्यांमुळे आपल्याच पक्षाची प्रतिमा खराब होईल या भीतीने स्थानिक आमदार सह कोणत्याही भाजप नेत्याने त्या विद्यार्थ्यांची प्रकृती पहायला गेले नसल्याची धक्कादायक चर्चा शहरात सुरु झाली असून आज पर्यंत त्या शाळा प्रशासन आणि फिरत्या आरोग्य पथकावर अजून पर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही हे विशेष…

 

या व्यतिरिक्त आपल्या नेत्याला भरघोस मतांनी निवडून दिल्या नंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना कोणती अडचण येत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे…

पहिला मुद्दा – उपलब्धतेचा अभाव. कार्यकर्त्यांचे किंवा नागरिकांचे फोन उचलणं साहेबांना आता दुर्मिळ सवय झाली आहे. तातडीच्या विषयावर संपर्क साधला तरी “फोन उचलणं” हा प्रकार त्यांच्या वेळापत्रकात नाहीच. अनेकांनी तक्रार केली की, कटाक्षाने संपर्क टाळण्याची कला त्यांनी पूर्णपणे आत्मसात केली आहे.

 

काटली अपघात प्रकरण हे याचे उत्तम उदाहरण. गंभीर अपघातानंतर नागरिकांनी त्वरित मदत आणि उपस्थितीची अपेक्षा केली होती, पण साहेब चार तासाचा वेळ निघून गेल्यावरच घटनास्थळी आले. लोकांच्या मनातला प्रश्न स्पष्ट होता – “आपला नेता कुठे होता?”

 

दरम्यान, आलिशान एक लाख रुपये मासिक भाड्याच्या इमारतीत उभारलेला ‘कर्तव्य कक्ष’ ही एक वेगळीच गोष्ट. नावाला ‘कर्तव्य कक्ष’, पण प्रत्यक्षात कर्तव्यदक्षतेचा गंधही नाही, असेच अनेकांचे म्हणणे.

 

मान-सन्मानाचा मोह हा आणखी एक ठळक मुद्दा. जिकडे हार, तोडे, सत्कार आणि टाळ्यांचा वर्षाव आहे तिथे साहेब वेळेआधी पोहोचतात. पण गोरगरीब शेतकरी, अडचणीत असलेले नागरिक, रुग्णालयातील पीडित… इथे पोहोचण्यासाठी मात्र घड्याळाचा काटा हळूहळू फिरतो.

 

यात भर घालणारी गोष्ट म्हणजे पत्रकारांबद्दलची भूमिका. “पत्रकारांची मला गरज नाही” असे बोलून, दुसऱ्या बाजूला स्वतः सोशल मीडियावर सेल्फी, व्हिडीओ, पोस्ट्स टाकून रोजचं ‘डिजिटल दर्शन’ देणं – हा विरोधाभासच म्हणावा लागेल. आणि इतकंच नव्हे, तर पी.ए.ची ‘चहा पेक्षा केटली गरम’ वर्तणूक अनेक कार्यकर्त्यांना त्रासदायक ठरते. लोकांच्या मते, आमदार साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी जणू पी.ए.च्या दरबाराची परवानगीपत्र घ्यावी लागते.

 

शेवटी, ठेकेदारांच्या फायद्याचे विषय यावर मात्र आमदार साहेबांचे लक्ष ‘जादा संवेदनशील’ असल्याची चर्चा जोरात आहे. विकासकामांपेक्षा ठराविक ठेकेदारांच्या सोयीसाठी घेतलेले निर्णय हे जनतेच्या नजरेतून सुटलेले नाहीत.

 

तसेच, जुन्या नेत्यांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न, त्यांच्या योगदानाला कमी लेखणे आणि स्वतःची प्रतिमा उंचावण्याची धडपड – यामुळे पक्षांतर्गतही नाराजी वाढते आहे.

 

एकूणच, गडचिरोलीतील कार्यकर्ते व नागरिकांच्या मनात आता एकच वाक्य वारंवार ऐकू येतं –

“आमदार साहेब, आरसा फक्त कॅमेऱ्यासाठी नाही, कधीतरी स्वतःकडे पाहायलाही वापरा!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here