आरोग्य केंद्रांमध्ये सेवारत परिचरांवर अन्याय …जिल्हा परिषदेसमोर शेकडो महिलांनी केले आंदोलन …

0
92

 

 

गडचिरोली : गेले अनेक वर्षे अल्प मानधनावर राबूनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांच्या विविध समस्यांकडे शासन कानाडोळा करत असल्याने १९ ऑगस्ट रोजी राज्यभरात एक दिवशीय धरणे आंदोलनाची हाक सिटू संलग्नित अंशकालीन महिला परिचर संघटनेने दिली होती. त्याअंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो महिलांनी धडक देत धरणे देवून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

 

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अंशकालीन महिला परिचरांना प्रतीमहा किमान वेतन 21000/- रुपये देण्यात यावे. संबंधित महिलांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. संबंधित महिलांना वयाच्या 59 वर्षानंतर 5000/- रुपये पेन्शन देण्यात यावे. अंशकालीन परिचरांना ग्रॅज्युएटी देण्यात यावी. थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे. दरवर्षी भाऊबीज साजरी करण्यासाठीही 5000/- रुपये देण्यात यावे. बायोमॅट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. आयुर्वेदिक ऍलोपॅथिक डीस्पेन्सरी मध्ये अतिरिक्त साफसफाईचे काम करुन घेतल्यास मोबदला देण्यात यावा अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

या धरणे आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे सोनकुसरे यांनी भेट देऊन त्यांना समर्थन दिले. यावेळी अंशकालीन महिला परिचर संघटनेच्या अध्यक्षा माधुरी मेश्राम, कार्याध्यक्ष सुवर्णा दासरवार, कोष्याध्यक्ष अर्पणा भोयर, सरचिटणीस साबेरा शेख व शेकडो महिला परिचर उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here