गडचिरोली |
भारतीय जनता पक्ष हा शिस्त, नैतिकता, राष्ट्रनिष्ठा आणि कायद्यानिष्ठा या तत्त्वांवर चालणारा पक्ष मानला जातो. मात्र, अलीकडील एका नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्हा भाजपमध्ये प्रचंड चर्चा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच भाजपच्या विधी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशी व्यक्ती नेमण्यात आली आहे, ज्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर गुन्ह्याचा आरोप असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील नागरिक यांच्यात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत –
“भाजपा म्हणजे वॉशिंग पावडर निरमा मशीन असे तर नाही ना?”
गंभीर स्वरूपाच्या आरोपांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीस पक्षातील संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या पदावर बसवणे, ही पक्षाच्या नैतिक अधिष्ठानावर गालबोट लावणारी बाब ठरत असल्याचे अनेकांचे मत आहे. जिल्ह्यातील वर्तुळात यावर जोरदार चर्चा रंगत आहे.
अनेक निष्ठावान, स्वच्छ प्रतिमा असलेले कायदेतज्ज्ञ पक्षात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. अशा वेळी गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीस अध्यक्षपद देणे, ही सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या घातक पायरी असल्याचे मत काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा धुळीत मिळेल का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाचा गौरव आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी, पक्षश्रेष्ठींनी या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून योग्य पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हा पातळीवरून होत आहे.