गडचिरोली:भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली असून, त्यावरून पक्षाच्या निष्ठावान व दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. प्रदेश पातळीवरून दिलेल्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
प्रादेशिक नेतृत्वाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुकाध्यक्ष व मंडळ अध्यक्षांची वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे ठेवण्यात यावी, अशी सूचना होती. मात्र अनेक ठिकाणी त्याला अपवाद करण्यात आले असून, गडचिरोली शहराध्यक्ष वयाची अर्धशतक ओलांडलेले असल्याचे उदाहरण समोर आले आहे. ही बाब युवक व नव्या नेतृत्वाला संधी न मिळण्याच्या भूमिकेकडे निर्देश करते.
युवामोर्चा अध्यक्ष पदासाठी २५ ते ३५ वर्षे अशी वयोमर्यादा असूनही, एका विशिष्ट नातेसंबंधातील व जातीतील व्यक्तीस — वय ४० असतानाही — या पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे पक्षात दीर्घकाळ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या युवकांवर अन्याय झाल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाच्या आघाड्यांवर — जसे की महिला आघाडी, युवामोर्चा, ओबीसी आघाडी, शेतकरी आघाडी, शहर अध्यक्ष — या सर्वच पदांवर एकाच जातीतील प्रतिनिधींची निवड झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पक्षाच्या सामाजिक समावेशकतेच्या धोरणाला झुगारण्यात आले असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
पक्षासाठी निष्ठेने व संघर्षाने लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. उलट काहींना सामान्य सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या उलट, लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्यात आल्याचे दिसत आहे.
तसेच, ज्या नेत्यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आपली पात्रता दाखवून दिली होती, त्यांना कार्यकारिणीतून दूर ठेवण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नेतृत्वाची घुसमट वाढली असून, हा संपूर्ण निर्णय कोणाच्या संकल्पनेतून झाला, याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही संपूर्ण रचना एका विशिष्ट तालुक्याभोवती केंद्रित असून, संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. पक्षात निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था सध्या फक्त खुर्च्या उचलणे व सतरंजी टाकणे यापुरती मर्यादित झाली असल्याचे चित्र दिसते.
आज गडचिरोलीसारख्या संघर्षशील जिल्ह्यात पक्षासाठी प्रामाणिकपणे रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून, आयाराम कार्यकर्त्यांना वरचढ करणे, हे पक्षाच्या जडणघडणीच्या तत्वांना धोक्यात घालणारे आहे, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.