आरमोरी:आरमोरी तालुक्यातील नदी पात्रातून रात्री ९ ते १० वाजेपासून रेती उपसा सुरू होऊन पहाटे पर्यंत सुरू असतो. याठिकाणी नदी पात्रात दोन ते तीन पोकल्यांड उतरवून हायवाच्या साहाय्याने रेती नदी पात्रातून वर काढली जाऊन डोंगराएवढे ढिगारे उभे केले जात आहे. या डंप केलेल्या रेतीची वाहतूक रात्रपाळीत दोन ते तीन पोकलेंड मशीन व 15 ते 20 हायवा टिप्पर च्या साहाय्याने केली जात आहे. हा व्यवसाय गेल्या महिन्या भरापासून बिनदिक्कतपणे सुरू आहे.
सध्या बांधकामासाठी रेतीची प्रचंड वाढलेली मागणी पाहता रेती माफियांनी याकडे आपली नजर वळवली आहे. हा गोरखधंदा बराच फोफावला आहे. अगदी नदीवरील पुलाला लागूनच मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याने पुलालाही भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शासन प्रशासनाने पाळलेले मौन संशयास्पद आहे.
रेती उत्खननामुळे होणारे प्रदूषण व पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन काही नियम व अटी घातल्या जातात. मात्र यंत्रणेच्या षंढ कार्यप्रणालीमुळे याठिकाणी या सर्वांचा बोजवारा होताना दिसून येत आहे.
मागच्या हफ्त्यात आरमोरी पोलिसांच्या वतीने देऊळगाव आणि डोंगरसावंगी घाटावर कारवाई करतांना चार आरोपींना अटक आणि शुभम निंबेकर फरार दाखविण्यात आले असून यांपैकी रेती तस्करीतला भागीदार असलेल्या शिक्षकी पेशातला एका मुख्य आरोपी ला मात्र मुद्दाम डावलण्यात आले होते, तसेच रेती डेपोवरील सरकारी नियमानुसार मान्यता असणारे चार लोकांना सुद्धा या कारवाईतून बाहेर ठेवण्यात आले असल्याची चर्चा सुरू झाल्याने तसेच गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लगेच दोन तीन दिवसात पुन्हा दोन्ही घाटांवर राजरोसपणे रेतीचा उपसा आणि अवैध वाहतूक सुरू झाल्याने आरमोरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.