गडचिरोली: गडचिरोली शहरात राजरोस पणे अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असून त्यामागे महसूल विभाग आणि पोलिस विभागाचा जणू काही छुपा पाठिंबा असल्याचे विदारक चित्र वारंवार पाहायला मिळत आहे.
गडचिरोली शहरात अवैधपणे रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याची बातमी जिकडे तिकडे पेपरात,चॅनल व डिजिटल मीडिया मध्ये वारंवार झलकल्याने अखेर थोड्याशा दडपणात येऊन का होईना आज जिल्हा खनिज अधिकरी उमेश बर्डे यांनी फक्त चार ब्रास रेती भरलेले दोन लहान टीप्पर जप्त करून रेती चोरीचा कोणताही गुन्हा दाखल न करता फक्त दंडात्मक कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडली.
या कारवाई बद्दल खनिज अधिकारी उमेश बर्डे यांना विचारणा केली असता रेती तस्करी चा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिसांकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने रेती चोरी चा गुन्हा दाखल केला नाही अशी माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही नदिघाटातून रेती उपसा करण्याची परवानगी देण्यात आली नसतांना सुध्दा खुलेआम रेती भरलेले टिप्पर ट्रक शहरातून जातांना दिसत असतात तरीही महसूल आणि पोलिस विभाग मुद्दाम कानाडोळा करीत असल्याने,शहरात लोकांकडून शासकीय कार्यप्रणालीवर शंका निर्माण केली जात आहे. आज झालेल्या कारवाईत गाडी मालक जयदेव नैताम यांची गाडी क्रमांक Mh 33T 3739 आणि राकेश निशाणे यांची गाडी क्रमांक Mh 33 w 3017 हे चार ब्रास रेती भरलेले दोन टीप्पर जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आले असल्याचे खनिज अधिकारी उमेश बर्डे यांनी सांगितले आहे.