Home राजकीय गडचिरोली नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचे बिगुल; प्रभाग क्र. ९-अ मध्ये ओबीसी जागेसाठी रंगणार राजकीय...

गडचिरोली नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचे बिगुल; प्रभाग क्र. ९-अ मध्ये ओबीसी जागेसाठी रंगणार राजकीय रणधुमाळी…

0
292

 

Gadchiroli: शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून गडचिरोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९-अ मधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी पोटनिवडणूक होणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रभाग क्रमांक ९-अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले मुक्तेश्वर काटवे यांचे काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या जागेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत गडचिरोली नगरपालिकेतील या महत्त्वाच्या जागेची निवडणूकही घोषित केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २६ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून २७ मे ते २ जून दरम्यान उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. आवश्यक असल्यास २० जून २०२६ रोजी मतदान होणार असून २१ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

या निवडणुकीच्या घोषणेनंतर गडचिरोली शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मोठ्या राजकीय पक्षांपासून ते लहान पक्षांपर्यंत सर्वांनी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू केली आहे. काही इच्छुकांनी तर आतापासूनच मतदारांशी संपर्क मोहिमाही सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांनीदेखील मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून “बाशिंग बांधण्याची” लगबग राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, प्रभाग ९-अ ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने समाजातील विविध गटांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार रणनीती आखली जात असून येत्या काही दिवसांत प्रचारपूर्व राजकीय बैठका, गाठीभेटी आणि समीकरणांची जुळवाजुळव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच संबंधित प्रभागात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभने देणे, घोषणा करणे किंवा कोणत्याही प्रकारचे राजकीय लाभ वाटप करण्यावर निर्बंध लागू झाले आहेत.

गडचिरोली नगरपालिकेच्या या पोटनिवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here