Home महाराष्ट्र “गडचिरोली नक्षलमुक्त केल्यानंतर आता शेतकरीमुक्त करणार काय?”; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून संतप्त शेतकऱ्यांचा...

“गडचिरोली नक्षलमुक्त केल्यानंतर आता शेतकरीमुक्त करणार काय?”; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून संतप्त शेतकऱ्यांचा सवाल……

0
536

 

गडचिरोली तालुक्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर गावात आज विमानतळ प्राधिकरणाकडून जागेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध करत सर्वेक्षण थांबविले. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गावात दाखल झालेल्या सर्वेक्षण पथकाने शेतजमिनींचे मोजमाप सुरू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी काही अधिकारी आणि कर्मचारी हिरापूर गावात दाखल झाले होते. त्यांनी गावातील शेतजमिनींचे सर्वेक्षण सुरू केल्यानंतर ग्रामस्थांना संशय आला. गावकऱ्यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट माहिती देण्याचे टाळले. “आम्ही नागपूरवरून आलो असून वरिष्ठांच्या आदेशावर काम करत आहोत,” अशी माहिती देत त्यांनी आपली ओळख आणि नेमका उद्देश लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे ओळखपत्र, आदेशाची प्रत आणि सर्वेक्षणाचा उद्देश विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांचे काम थांबवत त्यांना गावातच रोखून धरले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

तहसीलदार घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना “तुम्हाला कळत नाही का कशाचा सर्वे सुरू आहे? तुम्हाला माहिती आहे मग का विचारता?” अशा स्वरूपाची उद्धट वागणूक दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तहसीलदारांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला आणि वातावरण अधिकच चिघळले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच तहसीलदारांनी पोलिसांना पाचारण केले.

ताबडतोब पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी संयमाची भूमिका घेत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत “लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने भूमी अधिग्रहण करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले,” असा आरोप केला.

या संपूर्ण घटनेमुळे हिरापूरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. यामुळे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, या घटनेनंतर गडचिरोली काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला खासदार Dr. Namdev Kirsan, काँग्रेस जिल्हाध्यक्ष Mahendra Brahmanwade यांच्यासह शेकडो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. आमच्या परिसरातील जंगलामध्ये तेंदू पत्त्याची फळी जिल्ह्याभरातून सर्वात मोठी असून त्या ठिकाणी 12 लाख तेंदुपत्त्यांचे पुढे निर्मित होत असून सुद्धा “गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून जबरदस्तीने जमीन घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे? सर्वेक्षणापूर्वी गावकऱ्यांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही?” असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले.

विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी सर्वेक्षण पथकाला विरोध करून परत पाठवल्यानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी एम. अरुण यांच्या स्वाक्षरीने एक पत्र जारी करण्यात आले. या पत्रामध्ये मंडळ अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना ११ मे २०२६ पर्यंत संबंधित भागात सर्वेक्षण सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच हा सर्वे कोणत्याही खाजगी कंपनीसाठी नसून विमानतळ प्रकल्पासाठी होत असल्याचे नमूद करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देशही या पत्रात देण्यात आले होते.

मात्र हे पत्र घटनेनंतर जारी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला. “अगोदर गुप्तपणे अधिकारी गावात पाठवायचे, लोकांच्या जमिनींचे सर्वेक्षण करायचे आणि नंतर सूचना काढायच्या, हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव आहे,” असा आरोप गावकऱ्यांनी केला.

आजच्या या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावरही थेट सवाल उपस्थित केले. “गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केल्यानंतर आता शेतकरीमुक्त करणार आहात काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “विमानतळ किंवा इतर विकासकामांसाठी आमच्या पोटाची भाकरी असलेली सुपीक शेतजमीन घेण्याऐवजी सरकारने शासकीय जमीन, झुडपे किंवा जंगल क्षेत्राचा वापर करावा. आमची शेती जबरदस्तीने हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये.”

यावेळी काही शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत प्रशासन आणि राज्य सरकारला इशारावजा चेतावणी दिली की, जबरदस्तीने भूमी अधिग्रहणाचा प्रयत्न झाल्यास शेतकरी सामूहिक आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत.

हिरापूरमधील आजच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, विमानतळ प्रकल्प आणि भूमी अधिग्रहणाच्या मुद्द्यावर आता मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here