Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत ‘नीट’ परीक्षेत एआयच्या मदतीने हायटेक कॉपी; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल…

गडचिरोलीत ‘नीट’ परीक्षेत एआयच्या मदतीने हायटेक कॉपी; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल…

0
15

 

गडचिरोली, दि. — वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कडक तपासणी आणि त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात मोबाईल नेल्याचे समोर आले असून, यातील एका विद्यार्थ्याने चक्क ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) च्या मदतीने प्रश्नांची उत्तरे मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या कडेकोट बंदोबस्तातही विद्यार्थ्यांकडे मोबाईल कसा पोहोचला, याबाबत संशय व्यक्त केला जात असून, यामागे बाह्य सहकार्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर घटनेची माहिती देताना शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण मुनघाटे यांनी सांगितले की, परीक्षा सुरू असताना मोबाईलचा वापर करताना दोन्ही विद्यार्थ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तात्काळ त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्या विरोधात कॉपी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनघाटे यांनी पुढे सांगितले की, परीक्षा काळात सुरक्षारक्षकांकडून तपासणीमध्ये काही प्रमाणात त्रुटी राहिल्याची शक्यता आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी मोबाईल आत नेण्यात यश मिळवले असावे. तसेच, कोणत्यातरी व्यक्तीच्या मदतीने मोबाईल परीक्षा केंद्रात पोहोचवण्यात आला असावा, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून, सुरक्षा व्यवस्थेतील नेमकी चूक कुठे झाली आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

या हायटेक कॉपी प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here